भंडाऱ्यातील अग्नितांडवाने देश हळहळलाः सरकारची पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

0
222
छायाचित्रः ट्विटर

मुंबईः भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे संबंध देश हळहळला आहे.

 अख्खा महाराष्ट्र गाढ निद्रेत असताना भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बॉर्न युनिटमध्ये शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या ह्रदयद्रावक घटनेने संबंध महाराष्ट्र हळहळला आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही बोलले असून त्यांना तपासाचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचाः भंडारा रुग्णालयात अग्नितांडव,१० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली आगीची घटना दुर्दैवी आहे. हे दुःख व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडे आहे. शोकग्रस्त कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर शोकग्रस्त कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबाना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन मी महाराष्ट्र सरकारला करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 गृहमंत्री देशमुख देणार आज रुग्णालयाला भेटः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून ते स्वतः रुग्णालयाला भेट देणार आहेत. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून  १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज मी स्वतः घटनास्थळी भेट देणार आहे, असे ट्विट देशमुख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा