राज्यातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिट कराः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

0
324
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु देखभाल विभागात (एसएनसीयू) आग लागून दहा अर्भकाचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असतानाच राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटनेची पुनरावर्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व रुग्णालयात असलेल्या एसएनसीयू विभागाचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसएनसीयूमध्ये एकूण १७ नवजात बालके होती. त्यापैकी ७ बालकांना वाचवण्यात यश आले आहे.

हेही वाचाः भंडारा रुग्णालयात अग्नितांडव,१० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री  राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.

हेही वाचाः भंडाऱ्यातील अग्नितांडवाने देश हळहळलाः सरकारची पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईः दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत १० नवजात बालकांचा मृत्यु झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. या बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करेल हा विश्वास आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा