भंडारा रुग्णालय अग्निकांडाच्या चौकशीसाठी समिती स्थापन, तीन दिवसांत येणार अहवाल

0
93

नागपूरः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील  बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल, कसे सांगतानाच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

पोलिसही करणार चौकशीः  रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेशी सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही टोपे यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा