भंडारा रुग्णालयातील अग्नितांडवः आग लागली तेव्हा एसएनसीयूमध्ये ना डॉक्टर होते, ना नर्स?

0
206
छायाचित्रः ट्विटर

भंडाराः येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु देखभाल विभागात (एसएनसीयू) रात्री उशिरा आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. जेव्हा एसएनसीयूला आग लागली तेव्हा तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर किंवा नर्सपैकी कुणीही हजर नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे एसनसीयूमधील १७ नवजात बालकांना कोणाच्या भरवश्यावर सोडण्यात आले होते आणि एसएनसीयूतील डॉक्टर आणि नर्स कुठे गायब झाले होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये इन बॉर्न आणि आऊट बॉर्न असे दोन युनिट आहेत. त्यापैकी शनिवारी रात्री उशिरा दोन वाजेच्या सुमारास आऊट बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे ड्युटीवर असलेल्या नर्सच्या लक्षात आले. नर्सने दरवाजा उघडून बघितल्यावर त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणावर धूर दिसून आला, असे ड्युटीवर असलेल्या नर्सनेच सांगितले. याचाच अर्थ आग लागली तेव्हा आऊट बॉर्न युनिटमध्ये डॉक्टर किंवा नर्स यापैकी कुणीही हजर नव्हते. आऊट बॉर्न युनिटमध्ये ड्युटीवरील डॉक्टर किंवा नर्स यापैकी कुणी तरी हजर असते तर आग लागल्याचे लगचेच लक्षात आले असते आणि दहा नवजात बालकांचे जीव वाचवता येऊ शकले असते.

हेही वाचाः भंडारा रुग्णालयात अग्नितांडव,१० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

काही प्रत्यक्षदर्शींच्या मते काही नवजात अर्भकांचे शरीर काळे पडले होते. याचाच अर्थ आग आधीच लागली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आग लागल्याचे बऱ्याच उशिराने लक्षात आले. एसएनसीयूमध्ये एक डॉक्टर आणि किमान चार परिचारिका ड्युटीवर असतात. आग लागली तेव्हा हे सर्व जण कुठे होते? आणि एसएनसीयूमधील १७ नवजात अर्भकांना कुणाच्या भरवश्यावर सोडून देण्यात आले होते? असे सवालही आता विचारले जाऊ लागले आहेत.

हेही वाचाः राज्यातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिट कराः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

एसएनसीयूमध्ये नाही स्मोक डिटेक्टरः नवजात अर्भकांच्या देखभालीसाठी असलेल्या एसएनसीयूमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्यात आला नव्हता, अशी धक्कादायक माहितीही हाती आली आहे. येथे स्मोक डिटेक्टर असता तर आगीची माहिती अगदी प्रारंभिक टप्प्यावरच मिळाली असती आणि एसएनसीयूमधील सर्वच्या सर्व म्हणजेच १७ नवजात अर्भकांना सुरक्षित बाहेर काढता आले असते. या सर्वच घटनाक्रमावरून रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड होऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा