‘कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे!’

0
121
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः खरे बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितले जात आहे. मी काहीही चुकीचे बोललो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदी आणि त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनाच देशाची माफी मागावी लागेल, अशी शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

 नागरिकत्व दुरुस्ती कायदा,डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने भारत बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारला आक्रमकपणे धारेवर धरले. झारखंडमधील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना भारताचा प्रवास मेक इन इंडियाऐवजी रेप इन इंडियाच्या दिशेने सुरु झाल्याची टीका केली होती.त्यावरून भाजपच्या खासदारांनी शुक्रवारी संसदेत गोंधळ घालत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केल्याचे सांगत त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपच्या खासदारांनी केली होती. त्याला आज राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मी काहीही चुकीचे बोललो नाही. जे खरे आहे, तेच बोललो होतो. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. देशासाठी जीव द्यायला आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था संपावी असे देशाच्या शत्रूंना वाटत होते, मोदींनी ती संपवली!:  या देशाची अर्थव्यवस्था ही या देशाची शक्ती होती. पण ती आता राहिलेली नाही. अख्खे जग भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक करत होते. चीन आणि भारत आशियाचे भविष्य असल्याचे संपूर्ण जग सांगत होते, मात्र आता आपण दोनशे रुपये किलोने कांदा घेत आहोत. मोदींनी नोटबंदी करून देशाची अर्थव्यवस्थाच संपवून टाकली आहे. भारताची अर्थव्यवस्था संपावी, असे देशाच्या सर्वच शत्रूंना वाटत होते. आज आपली अर्थव्यवस्था संपली आहे. हे काम देशाच्या शत्रूंनी नव्हे तर आपल्याच पंतप्रधानांनी केले आहे. तरीही ते स्वतःला देशभक्त म्हणवून घेत आहेत, अशा प्रखर टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.

काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीला प्रचंड गर्दी झाली होती. छायाचित्र सौजन्य: काँग्रेसचे ट्विटर हँड्लर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा