भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूकः ममता बॅनर्जींना टक्कर देणार भाजपच्या प्रियंका टिबरीवाल!

0
158
संग्रहित छायाचित्र.

 कोलकाताः पश्चिम बंगालच्या बहुचर्चित भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपने प्रियंका टिबरीवाल यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी प्रियंका टिबरीवाल यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या स्वतःच याचिकाकर्त्या आणि वकीलही आहेत. या हिंसाचारावरूनच भाजपने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींना वारंवार घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्यावरून नजीकच्या काळात तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाद होत आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेल्या ममता बॅनर्जी यांना आपले पद अबाधित राखण्यासाठी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. याआधी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ १९५० मतांचा फरक होता. ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीला न्यायालयातही आव्हान दिले आहे. कोणताही घटनात्मक पेचप्रसंग उद्भवू नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी खेला होबेच्या जोरदार घोषणाही दिल्या. विधानसभा निवडणुकीत खेला होबे ही हिट घोषणा ठरली होती.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीनच दिवस राहिले आहेत. ३ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ममता बॅनर्जी या भवानीपूरच्याच रहिवासी आहेत. त्या २०११ आणि २०१६ अशा दोन निवडणुकांत या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

 प्रियंका टिबरीवाल या माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या कायदेशीर सल्लागार राहिलेल्या आहेत. बाबुल सुप्रियो यांच्या सांगण्यावरून त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल-मेमध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अंटली मतदारसंघातून त्या उभ्या होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

 प्रियंका टिबरीवाल या कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारला गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी एक याचिकाकर्ता म्हणून कोलकाता उच्च न्यायालयाला द्यायला लावले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यातही प्रियंका यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. या निवडणुकीत त्यांचा निभाव लागतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा