पंकजांच्या महत्वाकांक्षेला बीडमध्येच खोडा, सुरेश धसांनाच हवे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद!

1
214
संग्रहित छायाचित्र.

बीडः परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या  किमान विधान परिषदेवर जाऊन राजकीय पुनर्वसन करून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या या प्रयत्नांना बीड जिल्ह्यातील भाजपमधूनच खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंकजा यांचे समर्थक मानले जाणारे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी स्वतःच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले असून त्यासाठी ते मंगळवारीच दिल्लीत गेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून पंकजा मुंडे प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बंधू धनंजय मुंडे यांचा परळीमधून मोठ्या फरकाने विजय झाल्यामुळे मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यावरील आपला राजकीय प्रभाव टिकून ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांना आपले राजकीय पुनर्वसन करून घेण्याशिवाय पर्याय नाही. भाजपच्या कोट्यातून किमान विधान परिषदेवर जाऊन विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले तर कार्यकर्ते सांभाळून बीड जिल्ह्यातील प्रभाव टिकवता येऊ शकेल, अशी त्यांची अटकळ आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार अवघ्या साडेतीन दिवसांतच कोसळल्यामुळे पंकजांच्या अस्वस्थेत आणखीच भर पडली आहे. त्यातूनच त्यांनी फेसबुक पोस्ट करून 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर ‘वेगळा विचार’ मांडण्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ आणि त्यांनी मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची झालेली धावपळ यामुळे पंकजांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग सुकर झाल्याचे दिसू लागले असतानाच त्यांचेच समर्थक समजले जाणारे सुरेश धस हे स्वतःच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक असल्याची माहिती हाती आली आहे. धस यांनी त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावायलाही सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून ते मंगळवारी दिल्ली दरबारी गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजा मुंडेचेही त्यामुळेच खच्चीकरण !

 बीड जिल्ह्यातील सुरेश धस यांचे समर्थक त्यांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. धस समर्थकांची ही मागणी पुढे आल्यामुळे पंकजा मुंडेंना त्यांच्याच बीड जिल्ह्यातून पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तयार झाल्याचे सध्याचे चित्र आहे. सुरेश धस हे पंकजा मुंडे यांचेच बोट धरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. परंतु नंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधून त्यांचा विश्वास संपादन केला. सुरेश धस यांनी जून 2018 मध्ये भाजपच्या तिकिटावर उस्मानाबाद- लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला होता. पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच धस या निवडणुकीत विजयी होऊ शकले.आता तेच धस पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षांतर्गत बंडाच्या पवित्र्यात दिसू लागले आहेत.

हेही वाचा: बंडखोरी रक्तात नाही, पण मला पद मिळू नये म्हणूनच हे सर्व चालले आहे का ? : पंकजा मुंडेंचा सवाल

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा