जळगावमध्येही भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’: महापालिकेतील सत्ता गेली, शिवसेनेचा महापौर!

0
788
संग्रहित छायाचित्र.

जळगावः सांगली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा ‘कायक्रम’ केल्यानंतर तसाच ‘करेक्ट कार्यक्रम’ शिवसेनेने जळगाव महापालिकेतही केला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने शिवसेने जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला असून महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. राज्याच्या राजकारणात भाजपला सलग दोन जबर झटके बसले आहेत.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी दारूण पराभव केला आहे. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली आहे. ७५ सदस्यांच्या जळगाव महानगरपालिकेत ५७ नगसवेक म्हणजेच स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेचे १५ आणि एमआयएमचे ३ नगरसेवक आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे २७ नगरसेवक फुटले आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे जयश्री महाजन यांचा विजय सुकर झाला आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर असतानाच भाजपचे २७ नगरसेवक अचानक नॉटरिचेबल झाले होते. भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन महाजन हे रविवारी महापौर आणि उपमहापौरपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेणार होते. परंतु त्याआधीच भाजपच्या बहुमताला भगदाड पडले. शेवटच्या क्षणापर्यंत फुटीर नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला, मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

 करेक्ट कार्यक्रमः यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला अस्मान दाखवले होते. भाजपचे सहा नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठापणाला लागली होती. परंतु जयंत पाटलांनी ‘डावं दाखवून उजवं हाणलं’ आणि चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. तसाच करेक्ट कार्यक्रम शिवसेनेचे मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे गिरीश महाजन यांचा केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा