नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपला खिंडारः भास्करराव खतगावकरांचा राजीनामा, काँग्रेस प्रवेशाची घोषणा

0
1265
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः राज्यात होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून राजकीय उलथापालथी घडताना दिसू लागल्या आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच नांदेड जिल्ह्यातील भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली असून भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. खतगावकरांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीआधीच भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपच्या नांदेड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

 देगलूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यामुळे भास्करराव पाटील खतगावकर नाराज होते. अखेर खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा आज केली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच केले जाईल, असे काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः नांदेड भाजपची सूत्रे खा. चिखलीकर कुटुंबाच्या हाती एकवटल्यानेच ज्येष्ठ नेते अस्वस्थ, आणखी पडझड?

 देगलूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर निश्चितच विजयी होणार आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे, अशी घोषणाही खतगावकर यांनी केली आहे. खतगावकर हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

खतगावकर हे काँग्रेसचे जुने नेते होते. काँग्रेसमध्ये बरीच वर्षे राजकारण केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत ओमप्रकाश पोकर्णाही भाजपमध्ये गेले होते. आता खतगावकरांसह अनेक पदाधिकारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा