नांदेडमध्ये भाजपला धक्काः देगलूरमध्ये काँग्रेसचे अंतापूरकरांचा विजय, चव्हाणांनी सिद्ध केले वर्चस्व

0
698
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल ४१ हजार ९१७ मतांनी धुव्वा उडवला आहे. या विजयामुळे काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून हा पराभव भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा जोरदार प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. अशोक चव्हाण  यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी देगलूर-बिलोलीमध्ये काही दिवस तळ ठोकून संपूर्ण प्रचार यंत्रणाच राबवली. अखेर चव्हाण यांना आपला बालेकिल्ला शाबूत राखण्यात यश आले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७९८ मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले हे ११ हजार ३४७ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

 या विजयामुळे नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. एकूण ३० फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. अंतापूरकर यांनी घेतलेली आघाडी भाजप उमेदवार साबणे यांना शेवटच्या फेरीपर्यंतही कापता आली नाही. त्यामुळे मतमोजणीच्या २५ फेऱ्या पूर्ण झाल्यापासूनच अंतापूरकरांचा विजय निश्चित मानला जात होता.

कोणला मिळाली किती मते?:

 •  जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)-१,०८,७८९
 • सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)-६६,८७२
 • उत्तम इंगोले (वंचित बहुजन आघाडी)-११,३४७
 • विवेक केरूरकर (संयुक्त जनता दल)- ४६५
 • प्रा. परमेश्वर वाघमारे ( बहुजन समाज पार्टी)-१५५
 •  डी.डी. वाघमारे (रिपाइं-खोब्रागडे)-२१५
 • अरूण दापकेकर (अपक्ष)-१४३
 •  साहेबराव गजभारे (अपक्ष)-१८३
 •  भगवान खंदारे (अपक्ष)- २७४
 • मारोती सोनकांबळे (अपक्ष)-२४३
 • विमल वाघमारे (अपक्ष)- ४९६
 •  कॉ. प्रा. सदाशिव भूयारे (अपक्ष)- ४८६
 • नोटाः ११०३

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा