बिहारमध्ये कांटे की टक्करः ४२ जागांवर ५०० तर ७४ जागांवर एक हजारच मतांचा फरक

0
505
संग्रहित छायाचित्र.

पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस- राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये अटीतटीची लढत होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता एनडीए आणि महाआघाडीत ४२ जागांवर ५०० मतांचा तर ७४ जागांवर केवळ एक हजार मतांच्या फरक दिसू लागला आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काय येतील आणि बिहारचा सत्ताधीश कोण बनेल, याबद्दल कमालीची उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) उमेदवारांविरोधात सर्वच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्याचा सर्वात मोठा फटका जेडीयूला बसला असून जेडीयूची मते लोजपाने खाल्ल्याचे दिसू लागले आहे. सध्या जेडीयू फक्त ४७ जागांवर आघाडीवर आहे.

 हाती आलेल्या कौलानुसार सध्या भाजप ७६, राजद ६४, जेडीयू ४७, काँग्रेस २५ आणि लोजपा ३ जागांवर आघाडीवर आहे. २९ जागांवर अन्य उमेदवार आघाडीवर आहेत. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत स्पष्ट बहुमतासाठी १२२ सदस्यांची गरज आहे. हा जादुई आकडा कोण गाठतो, हे दुपारी चारनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए बिहारचे पुढचे सरकार स्थापन करेल, असा दावा जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला आहे. याआधी जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच पराभव मान्य केला होता. आम्ही महाआघाडीमुळे नव्हे तर कोरोनामुळे पराभूत झालो आहोत, असे त्यागी म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा