बिहारी मतदारांचा ‘तेजस्वी’ कौल, नितीश कुमार- मोदींना झटका; राजद-काँग्रेस महाआघाडीची सरशी!

0
1092
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः सबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून बिहारच्या मतदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएला नाकारले असून राजद- काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीला बिहारी मतदारांनी तेजस्वी कौल दिला आहे. महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीत १० लाख बेरोजगारांना नोकर्‍या देण्याचे अश्वासन देऊन निवडणुकीचा नूरच पालटून टाकणाऱ्या तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना मोदींनी जंगलराज के युवराज अशी शेलक्या शब्दांत टीका केली होती. सोबतच बिहारचा विकास करायचा असेल तर एनडीएला मतदान द्या, नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही केली होती. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.

मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे कौल असेः

एबीपी न्यूज– सी व्होटर

 • राजदः ८५
 • काँग्रेसः २५
 • भाजपः ७०
 • जदयूः ४२
 • लोजपाः२
 • इतरः १९

टाइम्स नाऊ– सी व्होटर

 • महाआघाडीः१२०  
 • एनडीएः ११६
 • इतरः ७

रिपब्लिक टीव्ही– जन की बात

 • महाआघाडीः १२८
 • एनडीएः १०४
 • इतरः ११

६३ टक्के मतदारांना हवा बदलः एक्झिट पोलमध्ये बिहारी जनतेला तुम्ही राज्यात सरकार बदलू इच्छिता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ६३ टक्के मतदारांनी आम्हाला राज्यात सरकार बदलायचे आहे, असे उत्तर दिले आहे. तर २७ टक्के लोकांनी आम्ही सरकार बदलू इच्छित नाही, असे सांगितले.

बेरोजगारी हाच सर्वात मोठा मुद्दाः कोणत्या मुद्यावर मतदान केले, असा प्रश्न बिहारी मतदारांना टूडेज- चाणक्यच्या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यातील ३५ टक्के मतदारांनी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे सांगत याच मुद्यावर मतदान केले. १९टक्के लोकांसाठी  भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा होता. तर उर्वरित ३४ टक्के लोकांसाठी अन्य मुद्दे महत्वाचे होते.

चिराग पासवान फेल?: विशेष म्हणजे एनडीएमधून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवणारे लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांना मात्र म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. काही एक्झिट पोलमध्ये त्यांना २ ते ४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या विरोधात लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा आपल्याला फायदा होईल, असा त्यांचा अंदाज होता, मात्र तो सपशेल फोल ठरल्याचे एक्झिट पोलचे निष्कर्ष सांगतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा