बिहार निवडणूकः भाजपच्या दृष्टीने नितीश कुमार आणि चिराग पासवान दोघेही ‘स्टार्ट-अप’च!

0
93
संग्रहित छायाचित्र.

गुगल अनेक उदयोन्मुख स्टार्ट-अप्सना विकत घेते आणि नंतर ते बंद करून टाकते. त्यामुळे इंटरनेटवरील गुगलची एकाधिकारशाही कायम ठेवण्यास मदत होते. बिहारमध्ये भाजपने २०१७ मध्ये आपल्या राजकीय लाभासाठी नितीश कुमारांचे स्टार्ट-अप आपल्या कह्यात घेतले. आता ते बंद करून एनडीएतून बाहेर पडलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचे स्टार्ट-अप कह्यात घेण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला आहे. त्यातून बिहारमधील आपली सत्ता कायम राखणे हाच एक कलमी हेतू आहे.

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असतील की अपेक्षित याचा अंदाज बांधणेही कठीण व्हावे, एवढी राजदच्या तेजस्वी यादवांनी सगळ्यांची हवा टाइट करून टाकली आहे. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी सर्वात मोठे नुकसान बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमारांचेच झालेले असेल, असेच एकंदर चित्र आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सगळ्या अपयशाचा दोष नितीश कुमारांना दिला जात आहे आणि त्यासाठी त्यांनाच जबाबदारही धरले जात आहे. भारताच्या निवडणूक इतिहासात असे पहिल्यांदाच घडताना दिसत आहे.

अनेक उदयोन्मुख स्टार्ट-अप्सना गुगल विकत घेते आणि नंतर ते बंद करून टाकते. त्यामुळे इंटरनेटवरील गुगलची एकाधिकारशाही कायम ठेवण्यास मदत होते. बिहारमध्ये भाजपने २०१७ मध्ये आपल्या राजकीय लाभासाठी नितीश कुमारांचे स्टार्ट-अप आपल्या कह्यात घेतले. २०२०च्या विधानसभा निवडणुकीतील एकूणच सूर आणि नूर पाहून आता ते बंद करून टाकण्याची वेळ आली आहे, असे भाजपला वाटू लागले आहे. त्यामुळे बिहारमध्ये सत्तेची एकाधिकारशाही कायम ठेवण्यासाठी एनडीएतून बाहेर पडलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचे ‘स्टार्ट-अप’ कह्यात घेण्याचा पर्यायही भाजपने खुला ठेवला आहे.

 बिहारमधील नितीश कुमारांची ही कहाणी देशातील सर्व मुख्यमंत्री आणि  प्रादेशिक नेत्यांसाठी हा इशारा आहे. जर तुम्ही दिल्ली दरबारात स्वतःला सामील करून घेतले तर तुमचा बळीचा बकरा झालाच म्हणून समजा. महेबुबा मुफ्ती, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान आणि पंजाबच्या बादल परिवारासोबत असेच झालेले देशाने पाहिले- अनुभवले आहे. आता तेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत होताना पहात आहोत. आता पुढचा नंबर हरियाणाचे दुष्यंतसिंह चौटाला यांचा आहे. त्याची कारणे अशीः

जुलै २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी काडीमोड घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भाजपशी साटेलोटे केले. त्यावेळी त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही, अशी घोषणा करून टाकली होती. त्यानंतर मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय सपशेल अपयशी ठरूनही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. विरोधी पक्ष राष्ट्रीयस्तरावर कुठेही दिसेनासा झाला होता. त्यामुळे मोदी युग अजूनही तरी जाणार नाही, असा समज नितीश कुमारांनी करून घेतला आणि भाजपशी हातमिळवणी करून राहण्यातच ते स्वतःला सुरक्षित समजून दिल्लीच्या दरबारात शरणागत होऊन गेले. लालूप्रसादांना झालेल्या तुरुंगवासामुळे तर नितीश कुमार स्वतःला फारच सुरक्षित समजू लागले होते. लालूंचे ‘लाल’ तेजस्वी यादव हा बछडा तर मोदींच्या लाटेत थोडासाही तग धरू शकणार नाही, या गैरसमजातच ते वावरले. परंतु आज बिहारमध्ये जे चित्र पहायला मिळते आहे, ते अगदी उलटे आहे. तेजस्वी यादवांनी मोदींचा करिश्माही फिका पडावा, एवढी उत्स्फूर्त गर्दी आपल्या प्रचारसभांना खेचण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचाः रोजगारही निवडणुकीचा मुद्दाः १० लाख नोकऱ्यांच्या ‘तेजस्वी’ आश्वासनाने बदलले बिहारचे राजकारण!

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांच्या बाबतीत आज जे चित्र पहायला मिळत आहे, ते नितीश कुमारांच्या दिल्ली दरबारातील शरणागतीचे फलित आहे. महागाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरायला हवे आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य सरकारला हे मतदारांना चांगलेच माहीत होते आणि आहेही. परंतु या निवडणुकीत मोदींच्या अपयशाचे सारेच खापर मतदार नितीश कुमारांवर फोडताना दिसत आहेत. बिहारमध्ये घडलेल्या सगळ्याच गोष्टींसाठी नितीश कुमारांना दोषी धरले जात आहे आणि मोदींचे गोडवे गायले जात आहेत. एवढेच कशाला एनडीएतून बाहेर पडलेले चिराग पासवानही तेच करत आहेत.

बिहार निवडणुकीत लोकांच्या असंतोषाचे सगळ्यात मोठे कारण आहे ते लॉकडाऊनचे. लॉकडाऊनमुळे बिहारमधील लाखो हात बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊन माथी मारला तो मोदी सरकारने. बिहारी लोक बेरोजगार झाले ते मोदी सरकारच्या लॉकडाऊनमुळे. २०१६ नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला घसरगुंडी लागली ती मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे. परंतु बिहारमध्ये या साऱ्या गोष्टींसाठी जबाबदार धरले जात आहे ते नितीश कुमारांना आणि त्यामुळेच नितीश कुमार नकोच, असा सूर बिहारच्या सर्वसामान्य मतदारांमधून उठू लागले आहेत! यापूर्वी राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपच्या प्रचारसभांमध्येच ‘मोदी तुझसे बैर नाहीं वसुंधरा तेरी खैर नहीं’ अशी नारेबाजी ऐकायला मिळालेली आहेच!

नितीश कुमारांनी मोदींच्या समोर शरणागती पत्करल्याची किंमत त्यांना आता पदोपदी मोजावी लागत आहे. त्यांनी मोदींसमोर शरणागती पत्करली नसती तर बिहारी जनतेने सगळ्या समस्यांचा दोष मोदींच्या माथी मारला असता आणि बिहारचा विकास सीएम नितीश कुमार नव्हे तर पीएम मोदी करतील, असे सांगत प्रचार करण्याची वेळ आली नसती!

दहा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील. राजदचे तेजस्वी यादव पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री बनतील, असे सध्या तरी राजकीय निरीक्षकांना वाटते. परंतु तसे झाले नाही आणि बिहारमध्ये त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली तर मोदींची भाजप नितीश कुमारांना अलगद बाजूला सारून पासवानांच्या लोजपाशी सत्तेचा ‘चिराग’ पेटवायलाही मागेपुढे पाहणार नाही. तेव्हा नितीश कुमारांचे स्टार्ट-अप बंद झालेले असेल आणि पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपसाठी चिराग पासवानांचे लोजपा स्टार्ट-अप बिहारमधील सत्तेची एकाधिकारशाही कायम राखण्यासाठी भाजपने आपल्या कह्यात घेतलेले असेल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा