बिहार निवडणूकः निकालाचे कल पाहून भाजपची भाषा बदलली, नितीश कुमारांचा ‘गेम’ करणार?

0
3146
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार ७२ जागांवर आघाडीसह भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागताच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील, असे आजवर सांगणाऱ्या भाजपची भाषा बदलली असून सरकारची स्थापना आणि नेतृत्वाबाबत सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. यातून भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.

बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या नेतृत्वातील एनडीए विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. पुन्हा सत्ता आली तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असेही मतदानाच्या दिवसापर्यंत सांगितले होते. मात्र आता भाजपने भाषा बदलली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा अद्याप एकही निकाल लागलेला नाही. मात्र जे कौल हाती आले आहेत, त्यानुसार भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निवडणुकीत नितीश कुमारांच्या जेडीयूला सर्वात मोठे नुकसान होताना दिसत आहे. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या लोजपाला भाजपनेच नितीश कुमारांच्या जेडीयूविरोधात निवडणूक मैदानात उतरवले, अशी जेडीयू कार्यकर्त्यांची भावना आहे.

बिहारमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत येण्याची चिन्हे दिसू लागताच आता नितीश कुमारांना भाजप मुख्यमंत्री होऊ देणार की नाही, हा कळीचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेने आम्हाला तारले आहे. सरकारची स्थापना आणि नेतृत्वाबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ, असे सांगत बिहारचे नेतृत्व बदलण्याचे संकेतच विजयवर्गीय यांनी दिले आहेत.

विजयवर्गीय यांचे वक्तव्य पाहता निवडणूक निकालाआधी नितीश कुमारांनाच मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा दिलेला शब्द भाजपकडून पाळला जाण्याची शक्यता कमीच आहे, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. निकालाचे कल असेच कायम राहिले तर भाजप मुख्यमंत्रिपदी आपल्याच पक्षाच्या नेत्याची निवड करू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा