रोजगारही निवडणुकीचा मुद्दाः १० लाख नोकऱ्यांच्या ‘तेजस्वी’ आश्वासनाने बदलले बिहारचे राजकारण!

0
50
छायाचित्रः twitter/@yadavtejashwi

पाटणाः ‘कमाई, पढाई और दवाई’चा नारा घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात झंझावात निर्माण करणारे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमधील तरुणांना दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन देऊन राजकारणाचा रंगच बदलून टाकला आहे. तेजस्वी यादव यांच्या दहा लाख नोकऱ्यांच्या चक्रव्यूहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएही पुरता अडकून पडला आहे.

 तेजस्वी यादव यांनी राजद- काँग्रेस महाआघाडी सत्तेत आल्यास बिहारच्या तरुणांना दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आधी तर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे आश्वासन हवाहवाई असल्याचेच सांगत होते. एवढ्या लोकांना पगार देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसाच नसल्याचा हिशेब ते मांडत होते.

तेजस्वी यादव यांच्या आश्वासनातील हवा काढून घेण्यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आकडेमोडही केली होती. एवढ्या लोकांच्या पगारावर ५८,४१५.०६ कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतील. त्यात जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते यांचा आकडा एकत्रित केला तर एकूण खर्च १,११,१८९ कोटी रुपयांवर जाईल. सरकारकडे एवढा पैसाच नाही. याचाच अर्थ हे आश्वासन पूर्ण केले जाऊ शकत नाही. ही फक्त हवाहवाई आहे, असे मोदी म्हणाले होते.

परंतु तेजस्वी यादव यांचे १० लाख नोकऱ्यांचे तेज बिहारी जनतेच्या मनात घर करू लागले होते. त्यामुळे सुशीलकुमार मोदी यांनी ही आकडेमोड सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचा निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध झाला, त्यात १९ लाख रोजगार देण्याचे आश्वासन होते. हे १९ लाख रोजगार आहेत की सरकारी नोकऱ्या हे मात्र या जाहिरनाम्यात स्पष्ट केलेले नाही. ज्या एनडीएचे नेतृत्व भाजप करते ती भाजप काय आश्वासन देणार आहे याची कानोकान खबर बिहारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लागू नये, हेही आश्चर्यच!

आजवरच्या निवडणुका या केवळ भावनिक मुद्यावर लढवल्या गेल्या. बिहारची ही निवडणूक रोजगाराच्या मुद्याभोवतीच फिरवण्याचे सारे श्रेय तेजस्वी यादवांकडे जाते. कमाई, पढाई आणि दवाई हा तेजस्वी यादवांचा नारा त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवू शकेल का? सध्या तरही तसाच माहौल असला तरी याचे उत्तर लवकरच मिळेल.

लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे ठप्प झाल्यामुळे खासगी क्षेत्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे सरकारी नोकऱ्यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सरकारी नोकरीची बातच काही और, खासगी क्षेत्राचाकाय भरवसा?, अशी चर्चा करताना तुमच्या आसपास अनेक लोक आढळतील. त्यामुळे बिहारमध्ये कोण जिंकणार, कोण हारणार? याही पेक्षा बिहारनंतर देशाच्या अन्य राज्यांतही रोजगार किंवा नोकऱ्या हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनणार का? या प्रश्नाचे उत्तर बिहार विधानसभा निवडणुकीचे निकालच देतील. तसा तो बनला तर जुमलेबाजीला तिलांजली देऊन भारताचे एकूणच राजकारणाची कूस बदललेली असेल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा