महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचे सावटः लातूर, बीडमध्ये कोंबड्या-पक्षांचा मृत्यू

0
275
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/ मुंबईः देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे रविवारीच केंद्र सरकारने जाहीर केले असतानाच महाराष्ट्रातील लातूर, बीडमध्ये कावळे आणि कोंबड्या दगावल्याने राज्यावरही या रोगाच्या साथीचे सावट आहे. मात्र अद्याप तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे, असे केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने म्हटले आहे.

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबड्या दगावल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. तीन कावळ्यांचे नमुने भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील ३२१ कुक्कुटपान केंद्राचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला, असे रविवारी केंद्र सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. हरियाणा राज्यातील पंचकुला जिल्ह्यातील दोन कुक्कुटपालन केंद्रातून संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली आहेत आणि तातडीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

गुजरातमधील सुरत जिल्हा आणि राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातून संकलित केलेल्या नमुन्यातही बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. नहान, बिलासपूर, मंडी जिल्ह्यातही मृतावस्थेत आढळेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशातील १३ जिल्हे बर्ड फ्लू बाधित झाले आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव झालेल्या केरळच्या दोन जिल्ह्यांत साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात पक्षांचे नमुने तपासण्यात आले, मात्र तेथे बर्ड फ्लूचा फैलाव नसल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने म्हटले आहे.

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ रविवारी नऊ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा