संकट आलेचः परभणीतील ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू, सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश

0
465
प्रातिनिधिक छायाचित्र.

परभणीः देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे रविवारीच केंद्र सरकारने जाहीर केले असतानाच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या परिसरातील सर्व कोंबड्यांसह पाळीव पक्षीही नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुरूंबाच्या आसपासचा दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. आता या परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात आठ कुक्कुटपालन केंद्रे असून त्यामध्ये आठ हजार कोंबड्या आहेत. चारच दिवसांपूर्वी या गावातील ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. कोंबड्याबरोबरच अन्य पक्षीही मृतावस्थेत आढळून आले होते. परभणी शहरातील नारायण चाळ परिसरातही तीन कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाने मुरूंबा गावातील मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. या नमुन्यांचा तपासणी अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. मुरूंबातील कोंबड्या एच५एन१ म्हणजेच बर्ड फ्लू या विषाणूच्या संसर्गानेच मृत्युमुखी पडल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून मुरूंबा गावातील ८ हजार कोंबड्यांसह सर्व पाळीव पक्षीही नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गावाच्या आजूबाजूचा दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. पक्षांमध्ये झालेला हा संसर्ग माणसांमध्ये पसरू नये म्हणून मुरूंबा गावाच्या दहा किलोमीटर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुरूंबा गावातील कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच सेलु तालुक्यातील कुपटा गावातील कोंबड्याही मृतमुखी पडल्या आहेत. त्यामुळे कुपटा गावही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. येथील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. या गावातील नागरिकांचीही आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

लातूर, बीडमध्येही पक्षी- कोंबड्यांचा मृत्यूः लातूर, बीडमध्ये कावळे आणि कोंबड्या दगावल्या असून मृतावस्थेत आढळेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे, असे केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने म्हटले आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबड्या दगावल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. तीन कावळ्यांचे नमुने भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील ३२१ कुक्कुटपान केंद्राचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला, असे रविवारी केंद्र सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. हरियाणा राज्यातील पंचकुला जिल्ह्यातील दोन कुक्कुटपालन केंद्रातून संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली आहेत आणि तातडीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा