भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी!

0
817
संग्रहित छायाचित्र.

कोल्हापूरः राज्यात सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वत्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असेच एकंदर राजकीय चित्र असताना मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या आघाडीची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापुरात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात आघाडी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका जाहीर झालेल्या ४३३ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उर्वरित म्हणजे ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. या निवडणुकीत साम, दाम आणि दंड नितीचा वापर सुरु झाला आहे.

गावागावात राजकीय पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणालाच अधिक महत्व असते. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक प्रचारात उतरणारे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र आपापल्या सोयीनुसार आघाड्या करून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशीच सोयीची आघाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झाली आहे.

महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यापासून शिवसेनेवर टीका केल्याशिवाय भाजप नेत्यांचा एकही दिवस जात नाही. त्याच चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेते आघाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर या चंद्रकांत पाटलांच्या गावातच झालेल्या आघाडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खानापूर ग्रामपंचायतीवर सध्या भाजपची सत्ता आहे. निवडणुकीच्या तोंडावर या गावात बरीच राजकीय उलथापालथ झाली. गेल्या दोन तीन महिन्यात खानापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी गट बदलले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहिलेले प्रवीण सावंत शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. त्यामुळे गावात राजकीय चुरस निर्माण झाली आणि मग ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली.गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी झाली. या आघाडीच्या विरोधात आता शिवसेना एकटीच लढणार आहे.

या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेतृत्व प्रवीण सावंत, भुजंगराव मगदूम, सुनिल मांगले, संदीप पाटील आणि संजय रेडेकर करत आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबीटकर यांच्या गटाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बी.डी. भोपळे करत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा दोन वर्षांपासूनच सुरू झाली होती. त्यातून आबीटकर आणि पाटील यांच्यातील वादाला तोंड फुटले. राधानगरीमधून निवडणूक लढवूनच दाखवा, असे खुले आव्हानच आबीटकर यांनी चंद्रकांत पाटलांना देऊन टाकले होते. या दोघांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आबीटकर गटाला शह देण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा