फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाआड येऊ नये म्हणूनच भाजपने कापला ‘बहुजन’ खडसेंचा पत्ता?

0
5399
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील भाजपच्या उभारणीसाठी तब्बल 42 वर्षांची कारकीर्द खर्ची घालणाऱ्या एकनाथ खडसेंचा भाजपने ‘लालकृष्ण आडवाणी’ करून टाकला आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत भाजपमधील तगडा  ‘बहुजन’चेहरा असलेल्या खडसेंचे नाव नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये कर्तृत्व आणि अनुभवानेही ज्येष्ठ असलेल्या खडसेंना विधानसभेची उमेदवारी दिली तर ते मुख्यमंत्रिपदावर दावा सांगून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडसर ठरू शकतात, त्यामुळे त्यांना विधानसभेपासून दूरच ठेवण्याची भाजपची रणनिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन नाथाभाऊंची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा असल्याचेही सांगितले जात आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. तशी इच्छा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. तेव्हाच खडसे भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात आले होते. परंतु महसूलमंत्रिपदावर बसवून त्यांची बोळवण करण्यात आली होती. मात्र भोसरी जमीन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना महसूमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घेणार घेणार म्हणत पद्धतशीरपणे लांबच ठेवण्यात आले. पहिल्या यादीत खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून काही दिवसांपूर्वीच अन्य पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या आयारामांचा भाजपने समावेश केला. त्यामुळे खडसेंना उमेदवारी मिळणार की नाही? अशी एकच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपच्या तिकिटाची वाट न पाहता खडसेंनी मंगळवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी या मतदारसंघातून भाजप खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना तिकिट देऊन एकनाथ खडसेंना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

या विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात आपलेच पूर्ण बहुमताचे सरकार येणार, असे भाजपने गृहित धरले असून देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौर्‍यात जाहीर करून टाकले आहे.खडसे यांचा जनसंपर्क आणि जनाधार उत्तम असल्याने त्यांना तिकिट दिल्यास ते मुक्ताईनगरमधून सहज विजयी होतील आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावेदारी करतील, अशी भीती असल्यामुळे आधीच त्यांचा ‘बंदोबस्त’ करण्याच्या रणनितीचा भाग म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात खडसेंना व्यासपीठावरही स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हाच भाजपने त्यांना विधानसभेपासून दूर ठेवण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते, असे माहितगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता खडसे कन्या रोहिणी खडसेंना मिळालेल्या तिकिटावर समाधान मानून गप्प बसतात की दाखल केलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवून बंडाचे निशान फडकवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 लेवा समाज भडकला

एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी नाकारून भाजपने लेवा समाजाचा अपमान केला आहे. भाजपने खडसेंना न्याय नाही दिला तर  सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत काय तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. लेवा समाजाने हात दाखवल्यास राज्यातील 35 विधानसभा मतदारसंघात भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा