एकनाथ खडसेंचा वनवास संपेना, भाजपकडून डॉ. भागवत कराडांना राज्यसभेची उमेदवारी

0
556
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये सुरू झालेला राजकीय वनवास काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपने खडसे यांना डावलून औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. कराड हे सध्या मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी औरंगाबादचे महापौरपदही भूषवले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे चार उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकतात. भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांना या आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. तिसऱ्या जागेसाठी आज डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या जागेसाठी एकनाथ खडसे, हंसराज अहिर आणि संजय काकडे यांची नावे चर्चेत होती. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती, मात्र भाजपने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांचा पत्ता कापून डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. भागवत कराड यांच्याकडे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीसपद आहे. तसेच ते मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्षही आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा