मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपची शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुखांना उमेदवारी

0
220
प्रातिनिधीक छायाचित्र.

नवी दिल्लीः राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आज चार उमेदवारांची नावे जाहीर केली असून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना तर पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपच्या बोराळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याशी लढत आहे.

विधान परिषदेवर पाठवायच्या पदवीधर मतदारसंघाच्या तीन आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन अशा पाच जागांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आधीच लागू झाली आहे. या पाचपैकी चार जागांवरील उमेदवार भाजपने आज जाहीर केले आहेत.

 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार मात्र भाजपने अद्याप जाहीर केलेला नाही.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचे वजन वाढले आहे. मात्र, आता राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समीकरण बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा