‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वादातून माफी न मागताच भाजप अलग बाजूला, महाराष्ट्रातच एकमेकांवर शरसंधान!

0
107
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादाला वेगळे वळण लागत चालले आहे. छत्रपती शिवरायांशी नरेंद्र मोदींची तुलना करून घेणारी भाजप, पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल या वादातून अलगद बाजूला पडत चालले आहेत आणि महाराष्ट्रातच एकमेकांवर शरसंधान साधले जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल भाजप, नरेंद्र मोदी किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी माफी मागावी, ही मागणीही मागे पडली आणि हा वाद वेगळ्याच वळणावर जाऊन ठेपला आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या वादावर आपली भूमिका मांडताना उदयनराजे भोसले यांनी शिवसेना काढताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यावर संतापलेल्या उदयनराजेंनी संजय राऊतांचे नाव न घेता तंगड्या तोडण्याची भाषा केली होती. आज संजय राऊतांनी पुन्हा उदयराजेंना प्रत्युत्तर देताना तंगड्या तोडण्याची भाषा नको, तंगड्या प्रत्येकालाच असतात, असे सांगत 10 ते 15 लोक छत्रपतींचे वंशज असूच शकत नाहीत, महाराष्ट्रातील 11 कोटी जनता छत्रपती शिवरायांची वंशज आहे, असे वक्तव्य केले आहे.

‘ आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद उद्भवल्यानंतर महाराष्ट्रातील एकाही भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांशी मोदींची तुलना अयोग्य आहे म्हणत निषेध नोंदवला नव्हता. शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेले चालते का? असे सवाल करत ते वेळ मारून नेत होते. त्यानंतर हा वाद शिवसेना नेते संजय राऊत आणि छत्रपती शिवरायांचे वंशज यांच्याच भोवती केंद्रित झाला आणि राऊतांनी उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यानंतर भाजप नेत्यांना कंठ फुटला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगोलग प्रसिद्धी पत्रक जारी करून मस्तवाल विधानाचा निषेध करत छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देऊन टाकला तर  भाजपचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याची तक्रार पोलिसांत दिली. या एकूणच प्रकारात ‘ आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा मूळ वाद बाजूला पडला आणि माफी मागण्याची वेळ न येताच पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल, नरेंद्र मोदी आणि भाजप अलग बाजूला पडलेले दिसून येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा