महाराष्ट्राचा ‘मध्य प्रदेश’ करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतीलः धनंजय मुंडे यांचा टोला

0
587
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपासारखाच भूकंप महाराष्ट्रातही होईल, असे दावे भाजपचे नेते करत असले तरी तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील, असा सणसणीत टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

मध्य प्रदेशातील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन लोटस’ मोहिमेत काँग्रेसचे वजनदार नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकारमधील त्यांच्या समर्थक २२ मंत्री- आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेते राज्यातही मध्य प्रदेशसारखा राजकीय भूकंप घडवण्याचे दावे करत आहेत. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

‘मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील. काही भाजपचे नेते यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणे त्यांचे काम आहे. मात्र भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही,’ असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा