फडणवीसांच्या पक्षांतर्गत विरोधकांना भाजप श्रेष्ठींकडून प्रमोशन,दिल्ली दरबारातील वजन घटले?

0
989
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या जोडीचे लाडके नेते अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस यांचे भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारातील वजन आता कमी होऊ लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फडणवीसांच्या पक्षांतर्गत राजकीय विरोधकांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून प्रमोट केले जात असून त्यांना मानाची पदे दिली जात आहेत. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारातील फडणवीसांच्या वजनाला ओहोटी लागली असल्याची चर्चा भाजपच्याच गोटात केली जाऊ लागली आहे.

भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांचे पक्षांतर्गत राजकीय विरोधक समजले जाणारे माजी मंत्री विनोद तावडे यांना सरचिटणीसपदावरून प्रमोशन देऊन थेट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले आहे. त्यानंतर भाजपचे विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून प्रमोट का केले जात आहे? त्यामागची नेमकी कारणे काय असावीत? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

२०१४ मध्ये भाजप- शिवसेनेने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले तेव्हा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदाव होते. परंतु त्यांचा पत्ता कट करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि खडसेंना मंत्रिपदावरच समाधान मानावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर देवेंद्र फडणवीसांचे पक्षांतर्गत वजन एवढे वाढल्याचे सांगितले जाते की या निवडणुकीत खुद्द नितीन गडकरीही आपल्या समर्थकांना विधानसभेची उमेदवारी मिळवून देऊ शकले नव्हते.

२०१९ च्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना भाजपने उमेदवारी दिली नाही. फडणवीसांनीच त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा तेव्हा होती. खडसेंप्रमाणेच चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, दिलीप कांबळे यांनाही विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. हे सर्व नेते २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत असंतोष धुमसत होता.

हेही वाचाः फसवाफसवीः सेट परीक्षा उत्तीर्ण एसटी प्रवर्गातून, प्राध्यापकाची नोकरी मिळवली ओबीसी प्रवर्गातून

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर फेकली गेल्यानंतर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांनी बंडखोरीचा सूर बुलंद केला होता. परंतु तेव्हा पक्षश्रेष्ठींनी हे प्रकरण शांत केले होते. परंतु एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंनाही ‘थप्पी’ला लावण्याचा प्रयत्न केला होता, असेही सांगण्यात येते. परंतु ते केंद्रात मंत्री आहेत.

खडसे हे महाराष्ट्रातील ओबीसी लोकसंख्येचा चेहरा होते. ते पक्ष सोडून गेल्यानंतर खडसेंचे पक्ष सोडून जाणे आणि पंकजा मुंडेसह अन्य नेत्यांची नाराजी आपल्याला महागात पडू शकते, याची जाणीव भाजप पक्षश्रेष्ठींना झाली. विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेची उमेदवारी कापणेही चुकीचे होते, याचीही जाणीव आता पक्षश्रेष्ठींना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी काही महिन्यांत मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक विधानसभा निवडणुकीनंतरची सर्वात मोठी निवडणूक मानली जाते. या निवडणुकांत भाजपचे राजकीय नुकसान टाळण्यासाठीच भाजप पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना प्रमोट करून झालेल्या चुकांची दुरूस्ती केली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

भाजप पक्षश्रेष्ठींकडून ज्या पद्धतीने प्रमोट केले जात आहे, ते पाहता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना  मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याची भाजप पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याचेही बोलले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय हट्टामुळेच शिवसेनेने भाजपशी असलेले २५ वर्षांचे राजकीय संबंध तोडल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते खासगीत बोलताना सांगतात. भाजपपासून विभक्त झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचेच सरकार असून हे सरकार पाडण्याचे फडणवीसांचे अनेक मुहूर्त हुकले आहेत.

ही महाविकास आघाडी राज्यात २५ वर्षे सत्तेत राहील, असे दावे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केले जात आहेत. अशा स्थितीत एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या जोरावर महाविकास आघाडीला टक्कर देणे म्हणावे तेवढे सोपे नसल्याची जाणीवही भाजप पक्षश्रेष्ठींना झाली असल्यामुळे त्यांनी फडणवीसांच्या राज्यात अडगळीत फेकल्या गेलेल्या नेत्यांना राजकीय महत्व देणे सुरू केले आहे, असे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा