मोदींनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलेः चंद्रकांत पाटलांचा गजब दावा

0
638
संग्रहित छायाचित्र.

पुणेः भाजप नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुणगान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु असे करताना ते अनेकदा गजब दावेही करतात. असाच एक अजब दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. प्रधानमंत्री मोदी हे मुस्लिमविरोधी नाहीत, हे पटवून देण्याच्या नादात ‘मोदींनीच एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले, मुस्लिम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवले नाही,’ असा दावा पाटील यांनी केला असून त्यांच्या या दाव्यामुळे त्यांचे ‘राजकीय इतिहासाचे ज्ञान’ सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

पुण्यात भाजयुमोच्या युवा वॉरियर्स अभियानाची सुरूवात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात बोलताना भाजप आणि मोदी हे मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करताना चंद्रकांत पाटलांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे.

देशाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना आमचा विरोध राहणारच. पण सर्वच मुस्लिमांना विरोध असण्याचे कारण नाही. खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी मुस्लिमांना प्राधान्य दिले. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले. मुस्लिम होते म्हणून बाजूला ठेवले नाही, असे पाटील म्हणाले.

वस्तुतः एपीजे अब्दुल कलाम हे २००२ ते २००७ या काळात देशाचे राष्ट्रपती होते. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना एनडीए सरकारने राष्ट्रपतीपदासाठी कलाम यांचे नाव सूचवले होते. त्यांच्या नावाला काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने पाठिंबा दिला होता. या काळात नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदयही झालेला नव्हता. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. असे असतानाही चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दाव्यामुळे त्यांचे ‘राजकीय इतिहासाचे ज्ञान’ चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा