संजय राठोडांचा राजीनामा घेता,मग सचिन वाझेंनाच एवढे संरक्षण का?: फडणवीसांचा सवाल

0
138
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मात्र विरोधक वाझे यांच्या निलंबनाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय होतो, मग सचिन वाझे यांनाच एवढे संरक्षण का? सरकारला त्यांना एवढे का घाबरते?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सचिन वाझेंबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आम्ही सभागृहात सचिन वाझे यांचा गुन्ह्यात हात असल्याचे पुराव्यासहित दाखवून दिले आहे. सचिन वाझेंना सीआययूच्या महत्वाच्या पदावर ठेवून चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे वाझेंना निलंबित करा, अशी मागणी आम्ही केली होती, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचाः वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंना क्राईम ब्रँचमधून हटवणार, गृहमंत्री देशमुखांची घोषणा

 आयपीसी कलम २०१ अंतर्गत सचिन वाझेंना अटक करा, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु सचिन वाझे यांना आशीर्वाद देणारे वरिष्ठ लोक असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला नाही, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होऊ शकतो. मग सचिन वाझेंसदर्भात एवढे संरक्षण का मिळते? सचिन वाझेंकडे एवढे काय आहे की ज्यामुळे सरकार त्यांना घाबरते, असा सवाल फडणवीसांनी केला. सचिन वाझेंना दबावाखाली पदावरून दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा