छत्रपती शाहू महाराज अनादर प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी!

0
159
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सामाजिक सुधारणांचे जनक, थोर क्रांतिकारी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांचा ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा उल्लेख केल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रभरातून चौफेर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून टिकेची झोड उठली होती. फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकावर नाक घासून माफी मागावी, या मागणीने जोर धरला होता. त्यातच छत्रपतींचे वंशज संभाजी छत्रपती यांनी छत्रपतींच्या घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी काय करायला हवे, हे आम्हाला कुणीही शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत आधी या वादात फडणवीसांचा साधा उल्लेखही टाळला होता. नंतर तासाभराने त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ट्विट केले होते.

हेही वाचाः फडणवीस, नाक घासून माफी मागाः महाराष्ट्राची मागणी; वंशज म्हणाले, ‘आम्हाला शिकवू नका’

महाराष्ट्रभरातील शिव-शाहू भक्तांकडून फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी झाली असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी छत्रपती यांच्या ट्विटनंतर एक ट्विट करून माफी मागण्याऐवजी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरूस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या दिलगिरीवर महाराष्ट्रातील शिव-शाहू भक्तांचे समाधान होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा