पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती, बूट हातात घेऊन दिल्या बाईट्स

0
23537
27 जानेवारी रोजी औरंगाबादेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या मंचावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात बूट घेऊनच माध्यमांशी बोलत होते.

औरंगाबादः भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुमारे पंधरा मिनिटे हजेरी लावली. मात्र या पंधरा मिनिटांच्या काळात त्यांना त्यांचे बूटच चोरी जाण्याच्या धास्तीने ग्रासले असल्याचे चित्र उपोषणस्थळी पहायला मिळाले. फडणवीस लाक्षणिक उपोषणाच्या मंचावर बूट हातात घेऊनच वावरले. एवढेच नव्हे तर एका हातात बूट घेऊनच त्यांनी मीडियाला बाईट्सही दिल्या.

 स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली पंकजा मुंडे यांनी आज मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी सुमारे पंधरा मिनिटे होते. या पंधरा मिनिटांपैकी आठ मिनिटे त्यांनी भाषण केले आणि उर्वरित वेळेत मिडीयाला बाईट्स दिल्या. यावेळी त्यांच्या उजव्या हातात असलेल्या त्यांच्या बुटांनीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फडणवीसांना उपोषणस्थळाहून आपले बूट चोरीला जातील अशी धास्ती तर वाटत नाही ना? अशी चर्चाही उपोषणस्थळी ऐकायला मिळाली.

जलयुक्त शिवार बंद केल्यास मोठी लढाई लढू- फडणवीसः आमच्या सरकारने मराठवाड्यासाठी आणलेल्या पाणी योजना बंद केल्या तर मराठवाडा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या योजनांचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर जरूर घ्या, हवे तर नाव बदला, पण जनतेच्या मनातील जलयुक्त शिवार योजना बंद करू नका. ही योजना बंद केली तर मोठी लढाई लढू, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला. मराठवाड्यात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आमच्या सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळवून नेले, असा आरोपही त्यांनी केला.

पंकजांना भर मंचावरच  अश्रू झाले अनावरः पंकजा मुंडे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना भावना अनावर झाल्या. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण आणि पक्षांतर्गत राजकारण अशा दोन्हीमुळे पंकजांना अश्रू अनावर झाले आणि त्या भर मंचावर रडल्या. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषणावेळी सुमारे चारशे ते साडेचारशे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा