मुद्दा ‘राजकीय संन्यासा’चाः पुढची २५ वर्षे राजकारण करणार, राजकारणाला माझी गरजः फडणवीस

2
576
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  राज्याची सूत्रे माझ्या हाती द्या, चार महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी गर्जना करणारे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांनी आज पुढची २५ वर्षे मला राजकारण करायचे आहे, राज्याच्या राजकारणाला माझी गरज आहे, असे स्वतःच स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. त्यामुळे ज्यावेळी मी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. नागपुरात विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना राज्याच्या सत्तेची सूत्रे माझ्या हाती द्या, चार महिन्यांत ओबीसींचे आरक्षण परत देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी गर्जना फडणवीस यांनी केली होती.

फडणवीसांच्या या घोषणेवर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती. मी फडणवीसांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली तर मी त्यांची भेट घेईन पण त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. राज्याच्या राजकारणाला त्यांची गरज आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली होती.

 त्याच मुद्यावर आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राऊत म्हणतात ते खरेच आहे की राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे. त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचे नसते. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. पुढची २५ वर्षे मी राजकारण करणार आहे. त्यामुळे  जेव्हा मी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. संन्यास घेण्याची गरजच पडणार नाही, हे मला माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेशी शत्रुत्व नाही, फक्त वैचारिक मतभेदः शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्व कधीच नव्हते. फक्त वैचारिक मतभेद होते. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्या विरोधात लडले त्यांचा हात पकडला म्हणूनच मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेसोबत पुन्हा मैत्रीच्या चर्चांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. जर तर करणाऱ्यांना केवळ स्वप्नच पहात बसावे लागते. म्हणूनच राजकारणात परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यावे लागतात, असेही फडणवीस म्हणाले.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा