संजय राठोडांचा राजीनामा घ्या, अन्यथा शक्ती कायदा समितीचे राजीनामेः फडणवीसांचा इशारा

0
118
छायाचित्र सौजन्यः twitter/@Devendra_Office

मुंबईः पूजा चव्हाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर शक्ती कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे राजीनामे देऊन बाहेर पडू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संजय राठोड यांचे नाव जोडण्यात येत आहे. काही ऑडिओ क्लिप बाहेर आल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले असले तरी पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मात्र याबाबत अद्याप कुठलीही तक्रार नोंदवली नाही किंवा कुणावर संशयही व्यक्त केला नाही. मात्र संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे.

सामान्यांना वेगळा न्याय आणि सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मोकळीक आपण दिली आहे काय? याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाही तर आम्ही शक्ती कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतून राजीनामे देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मंत्री संजय राठोड प्रकरणात सारे पुरावे असताना काहीही कारवाई होत नाही. पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधी पाहिली नाही. यापेक्षा अधिक पुरावे कोणत्या घटनेत सापडले नसतील. कारवाई होत नाही, याचा अर्थ असा की या प्रकरणात वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा