पाच वर्षे मुख्यमंत्री राहूनही फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंचे स्मारक उभारले नाहीः एकनाथ खडसेंची टीका

0
791

मुंबईः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे राहूनही देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादेतील स्मारक उभारता आले नाही, अशा शब्दात ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. खडसे यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान भवनात भेट घेऊन तब्बल 40 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे टिकास्त्र सोडले.

एकनाथ खडसे यांनी सोमवारी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे पाऊण तास चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आज, मंगळवारी मुंबईत आल्यावर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केल्यावर विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाच वर्षांपूर्वी मी मंत्री असताना औरंगाबादेत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी  जागा दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर स्मारकाचे काम झालेच नाही. पाच वर्षे मुख्यमंत्री राहूनही देवेंद्र फडणवीस हे स्मारक उभारू शकले नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 30 ते 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. 12 डिसेंबर रोजी स्व. गोपीनाथ मुंडे यांची जंयती आहे. आम्ही सगळे या दिवशी गोपीनाथ गडावर जाणार आहोत. या जयंतीचे औचित्य साधून स्मारकासाठी निधीची घोषणा करण्याची विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. ती त्यांनी मान्य केली. औरंगाबाद दौर्‍यात स्मारकाच्या जागेची पाहणी करण्याचेही त्यांनी मान्य केले, असे खडसे म्हणाले.

 भाजपमध्ये मी नाराज ही बातमीच खोटी: भाजपमध्ये मी नाराज आहे, ही बातमीच खोटी आहे, असा यू- टर्नही खडसे यांनी यावेळी घेतला. सुधीर मुनगंटिवार, विनोद तावडे यांनी माझ्या मनधरणीसाठी प्रयत्न केले, या बातमीत फारसे तथ्य नाही. काँग्रे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी माझे जवळचे संबंध आहेत, असे खडसे म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर 12 डिसेंबर रोजी खडसे आणि पंकजा मुंडे काय घोषणा करणार याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा