सव्वालाखांची लाच घेतली, भाजपचा ‘लोकविकास’ नेता जे. के. जाधव गजाआड

1
1338

औरंगाबादः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने मंजूर केलेली कर्जाची फाइल व कर्जाची उर्वरित रक्कम बँकेतून देण्यासाठी १ लाख २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना भाजप नेता आणि लोकविकास नागरी सहकारी बँकेचा संस्थापक अध्यक्ष जे. के. जाधव उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज दुपारी रंगेहाथ पकडले. जाधव याच्यासोबत बँकेचा लेखापाल लेखापाल आत्माराम संतराम पवारही एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. जाधवांना त्यांच्याच राजश्री शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

तक्रारदारांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कर्जाची फाइल लोकविकास नागरी सहकारी बँकेत जमा केली आहे. ही फाइल मंजूर करण्यासाठी व मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम बँकेतून देण्यासाठी लोकविकास बँकेचा संस्थापक अध्यक्ष जे.के. जाधव याने लेखापाल आत्माराम पवार याच्या हस्ते तक्रारदारांकडे १ लाख २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी एसीबीचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीची एसीबीने शहानिशा केली. त्यानंतर आज गुरूवारी दुपारी राजश्री शाहू महाविद्यालयात लाचेची सव्वालाखांची रक्कम स्वीकारताना लेखापाल आत्माराम पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने ही रक्कम जाधवच्या सांगण्यावरुन स्विकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला देखील एसीबीने अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक चावरिया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक संदीप राजपूत, पोलिस नाईक बाळासाहेब राठोड, संतोष जोशी, केवल घुसिंगे आणि राजेंद्र सिनकर यांनी केली.

पंधरा दिवसांपूर्वीच मागितली होती चार लाखांची लाचः शिपाईपदासाठी नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन देत योगेश लक्ष्मण कऱ्हाळे (२९, रा. गंगापूर) याच्याकडे जाधवने चार लाखांची मागणी केली होती. सुरूवातीला दोन लाख रुपये व उर्वरित रक्कम नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यावेळी योगेशला बजाजनगरातील हायटेक इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शिपाई पदावर नियुक्त करण्यात येईल असे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार जून २०१६ मध्ये योगेशने त्याला व मुलगा विक्रांत जाधवला टप्प्याटप्प्याने चार लाख रुपये दिले होते. पण महाविद्यालयाला शासकीय अनुदान नसल्याचे समजल्यावर योगेशने पैशांची मागणी केली होती. त्यावरुन त्याला दोघांनी जीवे मारण्याच्या धमक्या देत आता तुझे पैसे बुडाले असे म्हणत फसवणूक केली होती. या प्रकरणीही ३० जानेवारी २०१९ रोजी जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

जाधवने लाच मागितल्यामुळे यापूर्वी चालकाने केली आत्महत्याः संस्थेत कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या चालकाला तीन लाखांना जाधवने गंडवले होते. त्यातून कृष्णा उर्फ किशोर रतनराव चिलघर (३२, रा. गल्ली क्र. सी-३, संजयनगर) याने १७ जानेवारी २०१९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात फॅनला साडी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जाधवविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेचा अध्यक्ष जाधव याचा चिलघर हा कार चालक होता. त्याला दहा हजार रुपये पगाराची नोकरी होती. मे २०१६ पासून तो काम करत होता. त्याला संस्थेअंतर्गत असलेल्या राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे सांगत तीन लाखांची मागणी केली होती. त्यासाठी त्याला आपल्याच बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे सांगितले होते. कृष्णाने बँकेकडे तीन लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. पण बँकेने एकच लाख रुपये मंजूर केले होते. जाधवला एक लाख ६० हजार रुपये दिल्यानंतर देखील उर्वरित एक लाख ४० हजारांसाठी त्याने तगादा लावत ३१ डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाला कामावरुन कमी केले होते. त्यावरुन कृष्णाने सुसाईड नोट लिहीत गळफास घेतला होता.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा