गोपीनाथ गडावर भाजपचे वस्त्रहरणः भाजप माझ्या बापाचा पक्ष म्हणत पंकजांची बंडाची तलवार म्यान!

0
221
संग्रहित छायाचित्र.

बीडः परळी विधानसभा मतदार संघात सपाटून पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे. मी पक्ष सोडणार नाही, हवे तर मला पक्षाने काढून टाकावे, असे सांगत बंडाची तलवार म्यान केली. पक्षासाठी ज्यांनी संघर्ष केला, त्यांना वाऱ्यावर सोडणार का?, असे म्हणत त्यांनी त्यांची आगतिकताही बोलून दाखवली. मात्र अन्य एक नाराज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष नेतृत्वालाच आव्हान देत पंकजा भाजपतच, माझा मात्र भरोसा नाही, असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसमोरच बंडाचे निशाण फडकवले. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जोरदार बॅटिंग करून एकनाथ खडसेच खरे हिरो ठरले.

… हवे तर पक्षानेच मला काढून टाकावे- पंकजा मुंडे : भाजप हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचे घर, बापाची जमीन तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे. पक्ष ही एक प्रक्रिया असते. त्यावर कुणाचीही मालकी नसते. राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि व्यक्ती शेवटी ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्ष जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे मला माहीत नाही. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी, रुजवण्यासाठी हाल सोसले, संघर्ष केला अशा पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार की नाही? की त्यांनाही वार्‍यावर सोडून देणार? आम्हाला आमचा जुना पक्ष हवा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात अनेकांना मोठे केले. त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या, त्याचा शोध घ्या. मला कुठल्याही पदाची लालसा नाही. त्यामुळे मला भाजपच्या कोअर कमिटीतूनही मुक्त करा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी बंड का करेन? कोणाविरुद्ध बंड करू?, असा सवाल करत त्यांनी बंडाची तलवार म्यान केली.

 पंकजा भाजपतच, माझा मात्र भरोसा नाही-एकनाथ खडसे : शेठजी- भटजींचा पक्ष अशी ओळख असणार्‍या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडेंनी मोठ्या संघर्षातून महाराष्ट्रात भाजपचे स्थान भक्कम केले. त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले होते. ज्यांना आम्ही मोठे केले, त्यांच्याकडूनच आमच्या छळाची अपेक्षा नव्हती. आज पुन्हा आयुष्यात संघर्षाचा काळ आला आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला याचे दुःख आहे. मात्र पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून त्यांचा पराभव घडवून आणण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी आयुष्य वेचले. त्यामुळेच तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालात. मात्र त्याच गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला पाडण्याचे पाप तुमच्या डोक्यात कसे आले? आपोआप पक्ष सोडून गेले पाहिजे ही नीती पक्षातील लोकांकडून राबवली जाते आहे ती योग्य नाही. भाजपचे आजचे राज्यात जे चित्र उभे राहिले आहे, ते जनतेला मान्य नाही, असे भाजपचे वस्रहरण करत ज्येष्ठ नाराज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा भाजपतच रहाणार आहेत. माझा मात्र भरोसा नाही, असा इशाराही देऊन टाकला.

चुका माणसांकडून झाल्या, पक्षावर राग कशाला काढता?-चंद्रकांत पाटील : पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांनी त्यांच्या भाषणात पाठीत खंजीर खुपसल्याची भावना वारंवार बोलून दाखवत पक्षांतर्गत राजकारणाचे धिंडवडे काढल्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, चुका माणसांकडून होतात, पक्षावर राग कशाला काढता? नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यात त्यांची चूक नाही. आपल्या तक्रारी- व्यथांची पक्ष दखल घेईल. त्यावर मार्गही काढू. पण भविष्यात सगळे नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल, असे संवेदनशील शब्द वापरू नका, अशी माझी दोघांनाही विनंती आहे. त्याचे ओरखडे रहातात. नाथाभाऊ, तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करू नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्या आहेत. पक्षावर राग कशाला काढता? तू काल आला आहे, तुला जायचे तर जा. आम्ही पक्षातच रहाणार, असे तुम्ही आम्हाला सांगा आणि पक्षात राहूनच संघर्ष करा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा