बंडखोरी रक्तात नाही, पण मला पद मिळू नये म्हणूनच हे सर्व चालले आहे का ? : पंकजा मुंडेंचा सवाल

0
113
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पक्ष सोडणार की पक्षात राहूनच दबावगट निर्माण करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच त्यांनी आज मंगळवारी स्वतःहोऊनच स्पष्टीकरण दिले. आता मला घर बदलायचे आहे. मी म्हटले हेते 12 डिसेंबरला बोलेन. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे आताच त्यावर फारसे भाष्य करणे योग्य होणार नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आणखीच सस्पेन्स वाढवला आहे. बंडखोरी रक्तात नाही पण मला कुठलेही पद मिळू नये, यासाठी हे सगळे चालले तर नाही ना?, असा सवालही त्यांनी केला. शनिवारी फेसबुक पोस्ट केल्यानंतर पंकजा मुंडे काहीही बोलायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्या भाजप सोडणार, अशी चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी मंत्री बबनराव लोणीकर, विनोद तावडे यांनी पंकजांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जेवणाचे निमंत्रण दिले. त्यानंतर पंकजा मुंडे कॅमेऱ्यासमोर आल्या. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलेले आहे. परंतु मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. मला कुठलेही पद मिळू नये, यासाठी हे सगळे चालले तर नाही ना?, असा प्रश्‍न मला पडतो. मी कुठल्याही दबाव तंत्रासाठी फेसबुक पोस्ट टाकलेली नाही, असेही पंकजा म्हणाल्या. यातून पद मिळावे, अशी त्यांची सुप्त इच्छा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा