शिरीष बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापलेः पंकजा मुंडेंचा नेमका कुणावर निशाणा?

0
822
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा पत्ता कट करून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी असतानाच आज बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे यांनी ‘बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापले’, असे वक्तव्य केल्यामुळे पंकजांनी नेमका कुणावर नेम साधलाय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

 पंकजा मुंडे यांचे विश्वासू प्रवीण घुगे यांचा पत्ता कट करून शिरीष बोराळकरांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच पक्षाने सूचना दिल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे सांगत घुगे यांनी कालच उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यानंतर आज बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना पंकजा मुंडे यांनी उमेदवारीवरून आपण नाराज असल्याच्या सर्व अफवा आहेत, असा सांगतानाच ‘बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापले’ असे  वक्तव्य केल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

  मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भा बोराळकर यांनी गुरूवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सेव्हन हिल परिसरात पंकजा मुंडे यांच्या हस्ते विभागीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, पदवीधर निवडणूकप्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी आज येणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र मी आलेली आहे. दिवाळीचा सीझन असल्यामुळे आज विमाने कमी होती. सर्वच विमाने बूक होती. बोराळकर, अतुल सावे, बागडे नाना यांची मात्र मी यावे यासाठी सारखी धडपड चालू होती. त्यामुळे मी सातासमुद्रापार आलेली आहे की काय, असे मला वाटत होते. मात्र आम्हाला माणूसच सापडत नव्हता. शेवटी एकाचे तिकिट कापले आणि मी इथपर्यंत आले,  असे सांगत मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या कोअर कमिटीवरच निशाणा साधला आहे. मी जर आले नसते बाकीच्या उमेदवारांनाही बरे वाटले असते, असेही त्या म्हणाल्या.

भाजपकडून पंकजा मुंडे यांचे विश्‍वासू प्रविण घुगे हे इच्छूक होते. त्यांनी या मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीही केली होती. दुसरीकडे जयसिंगराव गायकवाड, किशोर शितोळे यांचीही नावे स्पर्धेत होती. मात्र ऐनवेळी पक्षाने बोराळकरांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावरही पंकजा मुंडे नाराज असल्याच्या, तसेच बंडखोरी होण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना पंकजा मुंडे यांनी हे विधान केले आहे.

नाव घेणार नाही असे बोराळकरांना आधीच सांगितले होतेः पक्षाची बैठक असते तेव्हा आपल्याला तीन-चार उमेदवार निवडायचे असतात. तेव्हा आपण पोटतिडकीने उमेदवारीसाठी प्रयत्न करतो. चार निवडणुका आहेत. सर्व प्रकारचे संतुलन असावे. सर्व वर्गांना समान संधी मिळावी, यावर विचार करावा लागतो. उमेदवारीचा निर्णय होण्याच्या आधी मी शिरीष बोराळकरांना माझ्या कार्यालयात बोलावले. दोन तास त्यांच्याशी चर्चा केली. भाजपचे जे संस्कार आहेत, भाजप म्हणजेच मुंडे साहेब आहेत, हे माझ्या मनातून कधीच पुसरले जाणार नाही. भाजप आणि मुंडे साहेबांचे जे संस्कार आहेत, त्या संस्कारांनीच मला सांगितले की शिरीषजी मी तुमचे नाव कोअर कमिटीत घेणार नाही, पण माझं दायित्व आहे की पक्ष जे नाव घेईल, त्याला विजयी करणे. त्यामुळे आता कामाला लागला, असेही पंकजा म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा