मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचे एक मत वाढले तरी स्वागतचः पंकजा मुंडेंचा खोचक टोला

0
839
छायाचित्रः twitter

मुंबईः आम्ही जे काही कष्ट केले ते पक्षासाठीच केले आहेत. माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा आहे, हे मी म्हणू शकत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याच्याविषयी काही म्हणणे नाही. माझे एवढेच म्हणणे आहे की, आता हे जे पक्षामध्ये  अडिशन झाले, त्यांचेही स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले, त्यांचेही स्वागत आहे आणि त्या मंत्रिपद मिळालेल्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक मत जरी वाढत असेल तर त्याचेही स्वागत आहे, असा खोचक टोला भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.

केंद्रीय मंत्रिमंडळात खा. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंड भगिनी नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या निर्णयावर आम्ही नाराज नाही. मला त्यावर आक्षेपही नाही. समर्थकांची जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आम्ही कधीच कोणत्या मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. आम्ही कधी कोणत्याही नेत्याची भेट घेतली नाही. प्रीतम मुंडेंच्या नावाची चर्चा होती. महाराष्ट्रात कोणत्याही पदाची चर्चा झाली तर मुंडेंची चर्चा होतेच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र अमान्यः टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही. आमच्या संस्कृतीला मीपणा अमान्य आहे. भाजपला देश प्रथम, नंतर राज्य आणि नंतर मी. भाजपत मीपणा मान्यच नाही. आपण, आम्ही असे म्हणणे मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणे पक्षाला मान्य असेल असे वाटत नाही, असेही पंकजा म्हणाल्या.

भाजपला मला संपवायचे आहे, असे वाटत नाहीः डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री करण्यात आले. हा पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव आहे, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात केली होती. त्याबद्दल विचारले असता पंकजा म्हणाल्या की, भाजपला मला संपवायचे आहे, असे वाटत नाही. पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील एवढी मी मोठी आहे, असे मला वाटत नाही.

स्वागतच आहे…: पक्षातील मूळ लोकांना बाजूला करून बाहेरून आलेल्यांना पदे दिली जात आहेत, याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, बाहेरून आलेल्या लोकांमुळे पक्षाला फायदा होतोय, असे पक्षाला वाटत असेल, तसा पक्षातील नेत्यांचा अनुभव असेल, तसे असेल तर चांगले आहे. नव्या मंत्र्यांना मी स्वतः शुभेच्छा दिल्या आहेत. कोणीही मोठे झाले तर त्याच्या पुढे लहान वाटावे इतक्या कोत्या मनाचे आम्ही नाही. पक्षामध्ये जे नवीन आलेत, त्यांचेही स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले, त्यांचेही स्वागत आहे आणि ज्यांना मंत्रिपद मिळाले, त्यांच्यामुळे भाजपचे एक मतही वाढत असेल तर त्याचेही स्वागतच आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा