पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे म्हणालेः मोठा भाऊ म्हणून मी नेहमीच सोबत!

0
464
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांनी स्वतःच ही माहिती दिल्यानंतर त्यांचे बंधू आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीला दिलासा दिला आहे. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, असा दिलासा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी सकाळी स्वतःच ट्विट करून दिली. माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलगीकरणात होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यावेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. या काळात जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करून काळजी घेण्याचे आवाहन पंकजा यांना केले आहे. ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकर बऱ्या व्हाल, काळजी घ्या पंकजा ताई, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी बहिणीची काळजी घेणारे केलेले हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या आधी खासदार प्रीतम मुंडे यांनीही एक व्हिडीओ पोस्ट करून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. २१ तारखेला मी आरटीपीसीआर चाचणी केली. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण मी सगळ्यांना आवाहन करते की, फक्त आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली म्हणून आपल्याला कोरोना नाही, या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टारांशी संपर्क साधा, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले होते. त्याही वेळी धनंजय मुंडे यांनी ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या, असा सल्ला दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा