पंकजा मुंडे खडसेंसह भाजपतील असंतुष्टांना सोबत घेऊन पक्षातच स्थापणार वेगळा गट?

0
184
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील साडेतीन दिवसांचे सरकार कोसळल्यानंतर भाजपमधील धुसपुस बाहेर येऊ लागली असून भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासारख्या भाजपतील असंतुष्टांना सोबत घेऊन त्या वेगळा गट निर्माण करून पक्षनेतृत्वावर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढे काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि 12 डिसेंबर आपण काय तो अंतिम निर्णय सांगू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीदिनी गोपीनाथ गडावर होणार्‍या कार्यक्रमात एकनाथ खडसेंसह भाजपतील असंतुष्ट नेते एकत्र येऊन पुढील रणनिती ठरवण्याची शक्यता आहे.

हातची सत्ता जाताच भाजपमधील अनेक असंतुष्ट नेते उघडपणे बंडाची भाषा करू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एककल्ली कारभारावर त्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर माझ्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहतांसारख्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीसापासून लांब ठेवण्यात आले. आम्हाला सोबत घेतले असते तर भाजपच्या 20-25 जागा नक्कीच वाढल्या असत्या, असा दावा करत 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, अशा शब्दांत फडणवीसांवर टिकास्त्र सोडले होते. त्यानंतर पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करून भूकंपाची चाहूल दिली आहे. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर होणार्‍या कार्यक्रमाला आपण जाणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले आहे. प्रकाश मेहताही गोपीनाथ गडावर हजर राहाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

पुढे काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेळ द्या, 12 डिसेंबर रोजी आपण काय तो निर्णय सांगू, असे पंकजा मुंडेंनी प्रथमच वक्तव्य केल्यामुळे पंकजा मुंडे भाजपतच रहातील, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे. पंकजा मुंडेंनी उभारलेले बंडाचे निशाण भाजपमधील आगामी पडझडीची चाहूल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असंतुष्टांची मोट बांधून भाजपमध्येच राहून वेगळा दबाव गट निर्माण करून आपणाला हवे ते इप्सित साध्य करायचे, असा पंकजांचा यामागचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

पंकजांची खेळी नेमकी कशासाठी?

1. भाजपने विधान परिषदेवर घेऊन राजकीय पुनवर्सन करावे आणि केंद्रात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना किमान राज्यमंत्रिपद तरी द्यावे, म्हणजे सत्ता घरात राहील आणि धनंजय मुंडेंना राजकीयदृष्ट्या तोंड देणे सोपे जाईल, असा या एकूणच हालचालींमागचा पंकजा मुंडेंचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

2.असंतुष्टांना सोबत घेण्यात एकनाथ खडसे यांच्यासारख्या बाजूला फेकलेल्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यात यावे, असाही त्यांचा प्रयत्न असेल. म्हणजेच एकाच वेळी सत्ता आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत वाटा मिळवून पंकजांना आपले राजकीय वजन अबाधित राखायचे आहे, असा या खेळीचा अर्थ काढला जाऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा