जावयाचे नाव काढताच रावसाहेब दानवे भडकले; पत्रकाराला म्हणाले: चल, दामाद को जाके पूछ!

0
242
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व त्यांचे सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वैर हा कायमच वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे जावयाचे नाव जरी काढले तरी दानवे भडकू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात तुरूंगातून सुटका झाल्यानंतर जाधव यांनी दानवेंवर आरोप करत जालना लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत दानवेंना पराभूत केले नाही तर मी माझ्या बापाची औलाद नाही, असे खुले आव्हान दिले होते. याविषयी रविवारी औरंगाबादेतील पत्रपरिषदेत दानवे यांना पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न विचारला, तेव्हा ते पत्रकारांवरच भडकले. चल, दामाद को जाके पूछ, असे एकेरी शब्द दानवेेंनी त्या पत्रकाराला वापरले आणि त्यांनी पत्रपरिषदेतून पाय काढता घेतला.

   काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात पुण्याच्या चतुःशृगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांची तुरूंगात रवानगी केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून रावसाहेब दानवे यांनी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तुला नाक घासत आणले नाही तर रावसाहेब दानवे नाव सांगणार नाही, असे दानवे मला एकदा म्हणाले होते. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, जालना लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पाडून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी माझ्या बापाची औलाद नाही, अशा शब्दांत जाधव यांनी त्यांचे सासरे दानवे यांना खुले आव्हान दिले होते.

हेही वाचाः दानवेंना निवडणुकीत पराभूत केले नाही तर मी बापाची औलाद नाहीः हर्षवर्धन जाधवांचा इशारा

या पार्श्‍वभूमीवरच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील महाराष्ट्रासाठीच्या तरतुदी सांगण्यासाठी औरंगाबादेत आले होते. त्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषद अंतिम टप्प्यात असतानाच एका पत्रकाराने त्यांना जावई जाधव यांनी जालना लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पाडून दाखवणार असल्याचे खुले आव्हान दिले आहे, याविषयी आपण काय सांगाल? असा प्रश्‍न केला. तेव्हा दानवे त्या पत्रकारावरच भडकले. चल, दामाद को जाके पूछ, असे  दानवे प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकाराला एकेरी बोलले आणि त्यांनी पत्रपरिषदेतून काढता पाय घेतला.

दानवेंना आधीच सतावत होते जावईभयः पत्रकार परिषदेदरम्यान जावयाविषयी प्रश्‍न विचारला जाईल, याची भीती रावसाहेब दानवे यांना आधीच होती. त्यामुळे त्यांनी पत्रपरिषद सुरू होण्यापूर्वीच आमदार अतुल सावे यांच्याकरवी जावयाविषयी पत्रपरिषदेत प्रश्‍न विचारू नका, अशी विनंती काही पत्रकारांना केली होती. मात्र पत्रपरिषद संपल्यानंतर बाइट घेताना एका पत्रकाराने त्यांना जावयावरून प्रश्‍न विचारलाच आणि दानवेंचा पारा चढला व ते भडकले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा