भाजप नेत्यांनी सरकार पाडण्याबद्दल बोलणे बंद केले तर अधिक चांगलेः दरेकरांकडून घरचा आहेर

0
704
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबादः महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याबाबत बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आता सरकार पाडण्यासाठी किती महिने लागतील, हे सांगणार नाही. भाजपच्या इतर नेत्यांनीही सरकारबद्दल बोलणे बंद केले तर अधिक चांगले ठरेल, असा घरचा आहेर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिला आहे.

 नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूरसारखा ५८ वर्षे ताब्यात असलेला मतदारसंघही भाजपला राखता आला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातच निष्प्रभ ठरल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले असून त्यांना नैराश्याने ग्रासले असल्याचे निष्कर्ष काढले जात असतानाच प्रवीण दरेकरांचे हे वक्तव्य आले आहे.

हेही वाचाः मराठवाडा पदवीधर मतमोजणीवर भाजपचा आक्षेप, मतमोजणी मॅनेज केल्याचा आरोप करत कोर्टात धाव

राजकारणात यश-अपयश येतच असते. त्यामुळे चार-पाच जागांच्या निकालात काही मागे पुढे झाले तर हुरळून जाण्याची गरज नाही. आम्ही पराभव खुल्या मनाने स्वीकार केला आहे. या पराभवाची कारणेही आम्ही शोधली आहेत. भविष्यात हातातून गेलेले मतदारसंघ भाजप राखेल, असा दावाही दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे आता सांगणार नाही, थेट कृती करू, असेही दरेकर म्हणाले.

विशेष म्हणजे या विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारातच भाजप नेत्यांनी सरकार पाडण्याबद्दलची वक्तव्ये केली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर दोन-तीन महिन्यांत भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे सरकार स्वतःच्या ओझ्याने पडेल, असे सांगितले होते. फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह भाजपचे सर्वच नेते सरकार आज पडणार उद्या पडणार असे दावे करत असतानाच दरेकरांनी सरकार पाडण्याबद्दल बोलणे बंद करण्याचा सल्ला देऊन भाजप नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा