रावसाहेब दानवेंच्या दरबारात ‘देवा’प्रमाणे दर्शन, आमदार- भाजप नेते एकसाथ झाले चरणी लीन!

0
3382
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या चरणी लीन झालेले भाजप पदाधिकारी.

नवी दिल्लीः जालन्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावासाहेब दानवे पाटील यांच्या नवी दिल्लीतील ‘दरबारा’त औरंगाबादचे भाजप आमदार आणि माजी मंत्री अतुल सावे यांच्यासह औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी लीन होऊन चरणस्पर्श करत असल्याचे चित्र गुरूवारी पहायला मिळाले.

औरंगाबादेतील भाजप नेते डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्या शपथविधीसाठी औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील भाजप नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने राजधानी दिल्लीत गेले होते. या पदाधिकाऱ्यांनी जालन्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी दानवेंच्या चरणी लीन होत चरणस्पर्श केला. दानवे यांचा चरणस्पर्श करण्यासाठी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांत जणू काही स्पर्धाच लागली होती की काय, अशी शंका यावी इतपत घोळक्यानेच हे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दानवे यांचा चरणस्पर्श करून ‘आशीर्वाद’ घेतले.

केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे पाटील यांच्या चरणी एकसाथ लीन झालेले भाजप आमदार अतुल सावे आणि अन्य पदाधिकारी.

भाजप हा अनुशासनप्रिय राजकीय पक्ष असल्याचे सांगितले जाते. नेत्यांचे चरणस्पर्श करण्याची नवी ‘अनुशासन’ संस्कृती आता भाजपमध्ये पाळेमुळे घट्ट रोवू लागल्याचेच या छायाचित्रावरून स्पष्ट होऊ लागले आहे. औरंगाबाद- जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी लीन होऊन रावसाहेब दानवेंचा केलेला ‘चरणस्पर्श’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नवी दिल्लीत गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच ही छायाचित्रे माध्यमापर्यंत पोहोचवली आहेत. भाजपमधील ही नवी ‘संस्कृती’ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा