हिरोइन म्हणजे कर्तबगार महिलाः भाजपचे माजी मंत्री लोणीकरांचे अजब तर्कट, वक्तव्यावर ठाम!

0
269

जालनाः जालना जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात परतूर-मंठ्याच्या तहसीलदार रुपा चित्रक यांना हिरोइन संबोधणारे भाजप आमदार आणि माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर सर्वस्तरातून टिकेची झोड उठली असली तरी ते मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. हिरोइन  या शब्दाचा अर्थ वाईट होतो, असे आपल्याला वाटत नाही. हिरोइन म्हणजे कर्तबगार महिला, असे अजब तर्कटही लोणीकरांनी सांगितले आहे. परंतु त्यांच्या मूळ भाषणात त्यांचा हेतू वेगळाच असल्याचे दिसून येते.

परतूर तालुक्यातील कऱ्हाळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बबनराव लोणीकरांनी हे बेताल वक्तव्य केले. त्यावेळी तहसीलदार  रुपा चित्रक मंचावर उपस्थित होत्या. त्यावेळी बोलताना लोणीकर सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर २५ हजार लोक आले, पन्नास हजार लोक लोक आले… तुम्हा सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीरभाऊला आणा, तुम्ही सांगा कोणाला आणायचं… तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मग एखादी हिरोइन आणायची तर हिरोइन आणा आणि नाही कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच, असे म्हणाले होते.

हेही वाचाः व्हायरल ऑडिओः भाजप आमदार लोणीकर भर कार्यक्रमात तहसीलदारांना म्हणाले ‘हिरोइन’

 लोणीकरांचे तर्कट असेः सर्वस्तरातून टिका सुरू झाल्यानंतर लोणीकरांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात की,… मंठा- परतूर दोन्ही तालुक्यात ३३ केव्हीच्या उपकेंद्राचे लोकार्पण होते. या भाषणात मी म्हणालो होतो की, सरकारने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आणि त्याच्यासाठी आपणाला मोठा मोर्चा काढायचा आहे. मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीरभाऊ यांना बोलवायचे आहे किंवा एखादी हिरोइन बोलवायची आहे, असे मी माझ्या भाषणात म्हणालो. हिरोइन आली नाही तर तहसीलदार मॅडम आपलं निवेदन स्वीकारायला येतील आणि त्या हिरोइन आहेत. याचा अर्थ वाईट होतो, असे मला वाटत नाही. हिरोइन हा शब्द म्हणजे मराठीमध्ये नायिका. नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असा त्याचा अर्थ होतो आणि आमच्या परतूरच्या तहसीलदार आहेत, मंठ्याच्या तहसीलदार आहेत. कर्तबगार आहेत. डॅशिंग आहेत. प्रशासनावर त्यांची पकड आहे. जनतेची कामे करण्याची त्यांची इच्छा शक्ती आहे आणि म्हणून हा शब्द आदरवॉइज वापरलेला आहे. आमच्या विरोधकांना मला विनंती करायची आहे की, तुम्ही याचे भांडवल करू नका. हिरोइन या शब्दाचा अपमान आपण करू नका. हे शब्द आदरवॉइज वापरलेले आहेत आणि चांगल्या भावनेने वापरलेले आहेत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा महिला अधिकाऱ्याला आपण म्हणतो डॅशिंग.सिंघम किंवा हिरोइन किंवा हिरो, असे आपण म्हणतो. आणि म्हणून आपण ही सगळी माहिती तपासा. गुगलवर ही सगळी माहिती उपलब्ध आहे. हे शब्द वाईट नाहीत. डिक्शनरीमध्ये हे सगळे आपल्याला पहायला मिळेल. वाटल्यास तर मी हे सगळे आपल्याला पाठवतो, असे लोणीकरांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा