व्हायरल ऑडिओः भाजप आमदार लोणीकर भर कार्यक्रमात तहसीलदारांना म्हणाले ‘हिरोइन’

1
1637
बबनराव लोणीकर

जालनाः भाजपचे परतूरचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात महिला तहसीलदाराला त्यांच्या उपस्थितीतच ‘हिरोइन’ संबोधल्याची ध्वनिफित व्हायरल झाली असून या प्रकरणी राज्य महिला आयोग काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

परतूर तालुक्यातील कऱ्हाळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बबनराव लोणीकरांनी हे बेताल वक्तव्य केले. त्यावेळी तहसीलदार  रुपा चित्रक मंचावर उपस्थित होत्या.  त्यांच्या उपस्थितीतच लोणीकर यांनी केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर समाजमाध्यमातून टिकेची झोड उठली आहे. लोणीकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पाच वर्षे पाणी पुरवठा खात्याचे मंत्रिपद भूषवले आहे.

काय बोलले लोणीकर?: ‘ हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायला का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर २५ हजार लोक आले, पन्नास हजार लोक लोक आले… तुम्हा सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीरभाऊला आणा, तुम्ही सांगा कोणाला आणायचं… तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मग एखादी हिरोइन आणायची तर हिरोइन आणा आणि नाही कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच, त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं’ असे लोणीकर या भाषणात बोलत आहेत.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा