विकास कामांत कमिशनची टक्केवारी विचारताच भाजप आमदार नारायण कुचेंची कार्यकर्त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ, व्हिडीओ व्हायरल

0
314

जालनाः विकास कामात तुम्ही किती टक्के कमिशन खाता, असा प्रश्न मतदारसंघातील तरूणांनी विचारताच बदनापूरचे वादग्रस्त भाजप आमदार नारायण कुचे यांचा तोल सुटला आणि त्यांनी कार्यकर्त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. कुचे यांनी केलेल्या शिविगाळीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे प्रत्येकच आमदाराला आता मतदारसंघातील विकास कामांची आठवण झाली आहे. भाजप आमदार नारायण कुचेही त्याला अपवाद नाहीत. बदनापूर मतदारसंघातील पांगरी गावात विकास कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आमदार कुचे गेले असता हा प्रकार घडला. गावात अधिकाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय एकही काम होत नाही, या बाबीकडे पांगरीच्या गावकऱ्यांनी आमदार कुचे यांचे लक्ष वेधले. अधिकारी मागतात त्या कमिशनमधील वाटा तुम्हालाही मिळतो का? तुम्ही किती टक्के कमिशन खाता? अशा प्रश्नांची सरबत्तीच पांगरीच्या तरूणांनी आमदार कुचे यांच्यावर केली त्यामुळे त्यांचा तोल सुटला. प्रश्न विचारल्यामुळे भडकलेल्या आमदार कुचे यांनी ’आमची बदनामी करता का मायचे xxx  हो’ अशा अर्वाच्च भाषेत शिविगाळ करण्यास सुरूवात केली. भडकलेल्या कुचेंना काही गावकरी शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आमदार कुचे यांचा पट्टा सुरूच राहिला. गावकऱ्यांनी प्रयत्न करूनही ‘कुठे हाय रे तो बबन…बोलीव बरं त्याला इकडं…’ असे म्हणत आमदार कुचेंची शिविगाळ सुरूच राहिली. गावकऱ्यांनी आमदार कुचे यांना शांत होऊन भूमिपूजन करण्यास सांगितले. त्याला नकार देत आमदार कुचेंनी पांगरीच्या सरपंचांनाच भूमिपूजन करण्यास सांगितले.

भाजप आमदार नारायण कुचेंची शिविगाळ करण्याची आणि वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आमदार कुचे यांच्या जाचाला कंटाळून एका पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्येची धमकीही दिली होती. चार वर्षांपूर्वी आमदार कुचे यांनी औरंगाबादेत एका सहायक पोलिस आयुक्तालाही शिविगाळ केली होती. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हाही दाखल झालेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा