‘बिरोबाची शपथ घेत भाजपला मतदान करू नका म्हणणारे पडळकर राजकारणासाठी काहीही करू शकतात!’

0
709
गोपीचंद पडळकर

अहमदनगरः बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका म्हणणारे गोपीचंद पडळकर स्वार्थासाठी स्वतःच भाजपमध्ये गेले. त्यातून त्यांना आमदारकी मिळाली. राजकारणासाठी पुढे ते काहीही करू शकतात, अशी घणाघाती टीका धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असलेल्या जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केली आहे.

बेताल आणि भडक वक्तव्य करून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी पातळी सोडून टीका करत प्रसिद्धीच्या झोतात आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आता त्यांच्याच समाजातून विरोध होत चालल्याचेच लहुजी शेवाळे यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होऊ लागले आहे. विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रात प्रस्थापित करू पहात असतानाच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असलेल्या जय मल्हार सेनेने त्यांच्यावर साधलेला निशाणा हा त्यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर माहिती देण्यासाठी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पडळकर यांच्या एकूणच भूमिकेवर बोलताना शेवाळे म्हणाले की, पडळकर राजकारणासाठी काहीही करू शकतात. एकदा समाजाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका असे म्हटले होते. आता त्यांनीच ती शपथ विसरून म्हणजेच बिरोबालाही बाजूला सारून स्वार्थी राजकारणासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातून त्यांना आमदारकी मिळाली. त्यांना पुढे जे काही पाहिजे असेल ते मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. समाजाच्या प्रश्नापेक्षा ते राजकारणच जास्त करतात, अशी टीका शेवाळे यांनी केली.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तत्काळ पावले उचलावीत. धनगर समाजाच्या प्रश्नावर तरी किमान चर्चा करून त्याला गती द्यावी, एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे धनगर समाज शांत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ज्या प्रकारे प्रयत्न सुरू केले, त्याचप्रमाणे धनगरांच्या आरक्षणासाठीही प्रयत्न करावे आणि आंदोलन टाळावे. आम्हाला येत्या काळात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारमध्ये सध्या चर्चा पूर्णतः बंद आहे. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सुरू केले आहेत. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी मंत्रालयात बैठक घ्यावी यासाठी थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्या चर्चेत काय होते ते पाहू आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असेही शेवाळे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा