भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, जयंत पाटील जाहीर करणार योग्यवेळी नावे!

0
1024
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्‍य वेळी त्‍यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, अशी माहिती अल्‍पसंख्यांक मंत्री तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिक यांच्या माहितीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून भाजपचे नेमके कोणते आमदार फुटणार याबद्दल तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात आघाडी सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपच्या काही नेत्‍यांकडून देण्यात आले. मात्र ते सर्व फोल ठरले. नुकत्‍याच झालेल्‍या विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत भाजपला मोठा धक्‍का बसला व आघाडीने यश मिळवले. त्‍यानंतर राजकीय चित्र हळूहळू बदलायला सुरूवात झाली आहे. आघाडी सरकारकडून विशेषतः राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे काही आमदार फुटणार असल्‍याचा दावा सातत्‍याने करण्यात येत आहे. नुकत्‍याच झालेल्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट विधानसभेतच भाजप नेत्‍यांनाही  इशारा दिला होता.

फक्‍त चार महिने थांबा, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देउन परत आमच्याकडे येतात की नाही हेच बघा असे अजितदादा म्‍हणाले होते. भाजपाचा राजीनामा देउन जे येतील त्‍यांना तिन्ही पक्षांचे समर्थन मिळेल त्यामुळे निवडून येण्यास त्‍यांना कोणतीच अडचण उरणार नाही, अशी ऑफरही अजितदादांनी दिली होती. त्‍यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांचा दावा खोडून काढला होता. आमचे १०५ आमदार आहेत. त्‍यातील एकही कमी होणार नाही. उलट वाढतीलच असे प्रत्‍युत्‍तर फडणवीस यांनी दिले होते.

आता नवाब मलिक यांनीही भाजपचे काही आमदार आमच्या पक्षनेतृत्‍वाच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपाला सोडचिठठी देउन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. योग्‍य वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्‍याची घोषणा करतीलच असेही नवाब मलिक यांनी म्‍हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा