एमआयएम आता पश्चिम बंगालमध्ये आम्हाला मदत करेलः भाजप खासदार साक्षी महाराजांचे वक्तव्य

0
224
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम हा पक्ष भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार केले जात असतानाच खुद्द भाजप खासदारानेच या आरोपाला पुष्टी देणारे वक्तव्य केले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशनंतर आता ते आम्हाला पश्चिम बंगालमध्ये मदत करतील, असे उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

लोकभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे आरोप झाले होते. महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही एमआयएमवर असेच आरोप झाले होते. खा. ओवेसी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एमआयएमला भाजपची बी टीम संबोधत ते भाजपला मदत करण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०२१ च्या निवडणुका लढवतील, असे म्हटले होते. त्यावर ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

हेही वाचाः धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाचले; भाजपने ऐनवेळी ‘मनसे’ दिलेली साथ आली कामी!

आता उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनीच केलेल्या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला पुष्टी मिळू लागली आहे. ‘ही ईश्वराची कृपा आहे, भगवान त्यांना शक्ती देओ. त्यांनी आधी बिहारमध्ये भाजपला मदत केली होती आता उत्तर प्रदेशात आलेले आहेत आणि पश्चिम बंगालमध्येही ते आमची मदत करतील,’ असे साक्षी महाराज म्हणाले. उत्तर प्रदेशात खुदा ओवेसी यांना शक्ती देओ, असेही साक्षी महाराज म्हणाले. विशेष म्हणजे मंगळवारीच ओवेसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. सर्वात आधी त्यांनी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आजमगडचा दौरा केला. त्यानंतर ते जौनपूरलाही गेले होते.

हेही वाचाः  भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणाऱ्या अण्णा हजारेंच्या गावातच निवडणुकीत भ्रष्टाचार, चार जणांवर गुन्हे

उत्तर प्रदेशाआधी बिहारमध्ये ओवेसी यांनी जबरदस्त एन्ट्री करत बिहार विधानसभा निवडणुकीची सगळी समीकरणेच बदलून टाकली होती. बिहारमध्ये ओवेसींच्या एन्ट्रीमुळे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला फायदा झाला आणि काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाचे महागठबंधन बहुमतापासून दूर फेकले गेले, असा अनेक राजकीय विश्लेषकांचा होरा होता. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केलेला आहे.

ज्या मतदारसंघात भाजपविरोधी राजकीय पक्ष भक्कम आहे, त्याच ठिकाणी ओवेसी उमेदवार उभे करतात, मुस्लिम मते मिळाली पाहिजे, अशाच पद्धतीने ते उमेदवार उभे करतात. परिणामी मुस्लिम मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होतो, असे आरोप ओवेसी यांच्या एमआयएमवर यापूर्वीही अनेकदा झाले आहेत.

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने १४ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी अमौर, कोचधमाम, जोकीहाट, बैसी आणि बहादूरगंज या पाच मुस्लिम बहुल मतदारसंघा एमआयएमचे उमेदवार निवडून आले. एमआयएममुळे राजद- काँग्रेसच्या महागठबंधनला १५ ठिकाणी फटका बसला. एमआयएम राजदची मुस्लिम वोट बँक फोडण्यात यशस्वी झाला आणि राजदचे मुस्लिम-यादव समीकरण तोडून टाकले, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के आहे आणि विधानसभेचे जवळपास १०० मतदारसंघ असे आहेत की, तेथील निकाल मुस्लिम मतदार बदलू शकतात, अशी स्थिती आहे. जवळपास ४० विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. तेथे त्यांची लोकसंख्या ५० ते ७० टक्के आहे. त्यामुळेच साक्षी महाराज यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. पश्चिम बंगालच्या ३४१ ब्लॉकमध्ये एमआयएमने आपल्या २०० हून अधिक शाखा सुरु केल्या आहेत. सर्व जिल्ह्यात एमआयएम सक्रीय झाली आहे आणि मोठ्या संख्येने मुस्लिम एमआयएमकडे आकर्षित होत आहेत.

इमामांचा विरोधः विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या इमाम संघटनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये राज्यातील मुस्लिमांनी एमआयएमला मतदान करू नये, असे आवाहन केले आहे. एमआयएमला टाकलेले प्रत्येक मत भाजपला जाईल, असे इमाम असोसिएशनचे मुहम्मद याह्या यांनी म्हटले आहे. ज्या राज्यात भाजपला विरोधी पक्षाकडून तगडे आव्हान मिळत आहे, त्या राज्यात हैदराबादचा एक राजकीय नेता निवडणुका का लढवत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा