भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत केला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. जलील यांचा हसतमुखाने सत्कार!

0
872
छायाचित्रः सोशल मीडिया

नवी दिल्ली/औरंगाबादः भाजप आणि एमआयएम हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याचे चित्र आपणाला नेहमीच पहायला मिळते. एकमेकांवर सडकून टीका करायला दोन्ही पक्षांचे नेते जराही कसर सोडत नाहीत. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एमआयएमच्या नेत्यांचा दिल्लीत जाऊन सत्कार केला असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर? तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? पण सोशल मीडिया मध्ये एक फोटो धुमाकूळ घालत आहे. या पोटोत भाजपचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील पदाधिकारी हे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो दिल्लीतील आहे आणि तोही केंद्रीय रेल्वे व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या ऑफीसच्या बाहेरचा!

दिल्लीतील रेल्वे भवनाच्या इमारतीच्या बाजूलाच दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धांच्या ‘मनोमिलना’चा हा प्रसंग घडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे आणि कार्यकर्ते हे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हसतमुख चेहऱ्याने सत्कार करत आहेत.  त्यामुळे भाजपचे पदाधिकारी सुहास्यवदने एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांचा सत्कार का करत होते?  असा प्रश्न आता औरंगाबादकरांना पडला आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र होती. परंतु राज्यातील सत्ता स्थापनेत शिवसेना आणि भाजपचे फाटल्यामुळे  आता औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात उभे राहणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेत आपली ताकद जर कमी पडली तर मदत लागू शकते, हे ओळखून भाजपने आतापासूनच सवतेसुभे करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आतापासूनच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावेत यासाठीच  भाजप पदाधिकाऱ्यांचा हा खटाटोप असावा, अशी औरंगाबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सत्कार एमआयएमचा पदाधिकारी करत होता, आम्ही फक्त बाजूला थांबलो होतो, असे स्पष्टीकरण दिले.मात्र भाजपच्या या या कार्यकर्त्यांमध्ये एखादाच एमआयएमच्या कार्यकर्ता कसा आणि अचानक कुठून अवतरला? आणि एमआयएमचा कार्यकर्ता भगव्या रंगाचा पुष्पगुच्छ कसा काय घेऊन आला? याचे उत्तर मात्र मिळत नाही.

इम्तियाज जलील यांनी सव्वादोन वर्षापूर्वी खासदार झाल्यानंतर औरंगाबादची विमान सेवा वाढावी आणि रेल्वेचे प्रश्न सुटावा यासाठी काहीवेळा सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. खासदार म्हणून जलील हे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रश्न घेऊन भेटलेही असतील. परंतु  दानवेंचेच कार्यालय असलेल्या दिल्लीतील रेल्वे भावनाबाहेर भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार का व कशासाठी केला? हे राजकीय कोडे मात्र कुणालाच उलगडत नाही. या सत्काराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सत्काराची फलनिष्पत्ती औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत किंवा त्यानंतर दिसणार काय? असा सवालही केला जाऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा