युतीचे बिनसले,भाजप अध्यक्ष अमित शहांनी दिले स्वबळावर बहुमताचे संकेत

0
2934

मुंबई : भाजप- शिवसेना युती शंभर टक्के होणारच अशा वल्गना करणाऱ्या भाजप आण शिवसेना नेत्यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईत जबरदस्त चपराक दिली. राज्यात बहुमताने भाजपचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होणार, असे शहा यांनी गोरेगावात आयोजित मेळाव्यात स्पष्टपणे सांगून टाकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार नाही, ही निवडणूक भाजप स्वबळावरच लढणार असल्याचे संकेत देऊन टाकले. त्यामुळे युतीच्या भरवश्यावर असलेल्या शिवसेनेची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीवेळीच युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असताना दुसरीकडे असा कोणताही फॉर्म्युला ठरलेलच नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारच्या मुंबई दौऱ्यात युतीबाबत महत्वाची घोषणा करतील, असे सगळ्याच राजकीय जाणकारांना वाटत होते. मात्र शहा यांनी युतीबाबत चकार शब्दही न काढता राज्यात बहुमताने भाजपचे सरकार येईल, असे भाकीत केल्याने युती होण्याची शक्यताच मावळल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा