ठाकरे सरकारविरोधी आंदोलनासाठी भाजपने जमवली होती ‘विकत’ची गर्दी !

0
341
प्रातिनिधीक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारविरोधात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यासाठी भाजपने पैसे देऊन गर्दी जमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजपने राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचर आणि मागील सरकारचे निर्णय विद्यमान सरकारकडून बदलत येत असल्याच्या मुद्यावर मंगळवारी राज्यभर आंदोलन केले. मात्र पुण्यातील या आंदोलनासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीने या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांशी चर्चा केली असता आपण नेमके कशासाठी आंदोलन करतोय,हेच या लोकांना माहीत नसल्याचेही समोर आले आहे.  पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व चौकात भाजपने हे आंदोलन केले होते. आम्हाला पैसे दिले जातील, असे सांगण्यात आल्यामुळे आमच्या भागातील महिलांसोबत मी येथे आले आहे, असे सिंहगड रोडच्या रहिवासी दीपाली पाटोळे यांनी सांगितले. आमच्या भागातील कार्यकर्त्यांनी आम्हाला येथे या, शंभर रूपये दिले जातील, असे सांगितले होते. पण आम्हाला येथे उन्हात बसवून फक्त वडापावच दिला, साधे पाणीही दिले नाही, असे कामगार वस्तीच्या रहिवासी राजूरबाई कांबळे यांनी सांगितले. आम्हाला निषेधाचे माहीत नाही. या ठिकाणी आल्यानंतर पैसे देऊ असे सांगण्यात आले होते. त्यामुळे काम बुडवून मी येथे आलो आहे. माझ्यासोबत ५० ते ६० माणसेही आली आहेत, असे राजेंद्र ढवळे यांनी सांगितले. हा प्रकार समोर आल्यामुळे भाजपने केलेल्या आंदोलनात खराखुरा निषेध करण्यासाठी आलेली गर्दी किती?, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा